Cybercrimes : आयसीएमआरच्या सहाय्यक संचालकांचा मोबाईल हॅक
गोल्डन अवरमध्ये उपाययोजना केल्याने सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न फसला
मुंबई :
केंद्र शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, मुंबईचे सहायक संचालक डॉ. श्याम सुंदर नंदी यांचा मोबाईल ९ जून रोजी दुपारी १२ वाजता ‘कुरिअर स्कॅम’ या प्रकारामध्ये सायबर गुन्हेगारांनी हॅक केला. डॉ नंदी यांचा मोबाईल हॅक करून सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या मित्रांकडे व्हाट्सॲपच्या आधारे ४८ हजार रुपयांची मागणी करणारा मेसेज सर्वांना पाठवला. गोल्डन अवर या काळात योग्य ती उपाययोजना केल्यामुळे आर्थिक हानी होण्यापासून डॉ नंदी आणि व्हाट्सॲप ग्रुपमधील इतर सभासदांना वाचविण्यात यश आले. याकरता डॉ. अमित डोंगरे यांनी गोल्डन अवरमध्ये सायबर सुरक्षाबाबतच्या उपाययोजनांचा अवलंब करून नंदी यांचे बँकेतील पैसे, यूपीआय खात्यामधील पैसे वाचविले तसेच त्यांच्या नावाने कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड आणि लोन मान्य होणार नाही याकरिता प्रयत्न केले. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा प्रयत्न फसला.

Cybercrimes : डॉ नंदी यांच्याबाबत कसा घडला कुरिअर पार्सल सायबर स्कॅम
डॉ . नंदी यांना दुपारी १२ च्या दरम्यान ब्ल्यू डार्ट कुरियर मधून बोलतोय असा एका व्यक्तीचा फोन आला त्या व्यक्तीने पार्सल आलेले आहे असे सांगून पार्सल आणणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा नंबर पाठविला. तो नंबर *२१* 9631360052 या क्रमांकाचा होता, या नंबरवर फोन केल्यावर त्यांच्या मोबाईलचा कॉल फॉरवर्ड हा पर्याय ऍक्टिव्ह झाला. *२१* हा कोड एअरटेल नेटवर्कचा कॉल फॉरवर्डिंग कोड आहे. हे डॉ. नंदी यांना माहीत नव्हते. त्यामुळे त्यांचे सर्व फोन कॉल्स हे सायबर गुन्हेगारांना फॉरवर्ड होत होते. नंतर गुन्हेगारांनी लॅपटॉपमध्ये डॉ. नंदी यांच्या मोबाईल क्रमांकाचे व्हाट्सॲप लॉगिन करून व्हॉइस ओटीपीद्वारे कोड जनरेट केला. डॉ नंदी यांच्या व्हाट्सॲपचा त्यांना ॲक्सेस मिळाला. त्याद्वारे त्यांनी डॉ. नंदी यांच्या परिचयातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना ४८ हजार रुपयांची मागणी करणारा मेसेज पाठवला. यावेळी डॉ. नंदी यांचा मोबाईल हा स्विच ऑफ लागत होता.
गोल्डन अवरमध्ये केलेल्या कामाची माहिती
सायबर फसवणूक किंवा ऑनलाईन फ्रॉड झाल्यानंतरचे पहिले 1 ते 2 तास हा कालावधी गोल्डन अवर म्हणून ओळखला जातो.या वेळेत त्वरित तक्रार केल्यास किंवा सायबर सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविल्यास आर्थिक नुकसान टाळता येते. गोल्डन अवरमध्ये डॉ. अमित डोंगरे आणि डॉ. नंदी यांनी मिळून कोणी पैसे ट्रान्सफर करू नये म्हणून सर्वांना अवगत करण्यात आले. तसेच त्यांना तात्काळ महत्त्वाच्या व्हाट्सॲप ग्रुपमधून काढण्यात आले. सायबर गुन्हेगारांनी पाठवलेली कोणत्याही प्रकारची इमेज फाईल, पीडीएफ फाईल डाऊनलोड करू नका म्हणून सर्वांना आवाहन करण्यात आले. कॉल फॉरवर्डिंग ऑप्शन बंद करण्यात आला, ऑनलाइन तक्रार नोंदविण्यात आली, सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करण्यात आली. बँकेशी संपर्क साधून अकाउंट फ्रिज करण्यात आले. तसेच बँकेला ई-मेलद्वारे कोणत्याही प्रकारचे क्रेडिट कार्ड अथवा लोन मान्य न करण्याचे पत्र पाठवण्यात आले. सर्व ईमेल आणि नेट बँकिंगचे पासवर्ड बदलण्यात आले. डॉ. नंदी यांच्या मोबाईल मध्ये यूपीआय पेमेंट ॲप, जीमेल, नेट बँकिंग पासवर्ड बदलण्यात आले. मोबाईलमधील महत्त्वपूर्ण डेटा चोरला गेल्याची शक्यता असल्याने पुढील सायबर सेक्युरिटी बाबत उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.


