Diesel price hike : एसटीला वर्षाला १२४ कोटींचा फटका
राज्यस्थानप्रमाणे मूल्यवर्धित करात सूट द्यावी अन्यथा आर्थिक संकट - श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केली शंका
मुंबई :
एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदी दरात सरासरी प्रति लिटरला ३ रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वर्षाला अंदाजे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त फटका महामंडळाला बसणार आहे. त्यामुळे राजस्थान सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करात सूट द्यावी, अन्यथा एसटीला मोठ्या अर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल यात तिळमात्र शंका नाही असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.

दररोज लागते १० लाख ८७ हजार लिटर Diesel
एसटी महामंडळाला दररोज सरासरी १० लाख ८७ हजार लिटर इतके डिझेल लागते. त्यामुळे इंधनावर एसटी महामंडळाला वर्षाला सरासरी ३ हजार ४०० कोटी रुपये इतका खर्च येतो. मोठ्या प्रमाणात इंधनावर होणारा खर्च टाळण्यासाठी व महाराष्ट्रात मूल्यवर्धित कर २१ टक्के इतका असल्याने व त्या तुलनेत गुजरातमध्ये मूल्यवर्धित कर १४.९ टक्के इतका कमी असल्याने एसटी महामंडळाचे अध्यक्ष व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुजरात राज्यातून डिझेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ती फाईल सरकारकडून मंजूर करण्यात आली असून त्यातून २५१ डिझेल पंपापैकी ९४ पंपावर लागणारे डिझेल कमी दरात मिळेल. पण तो दर सुद्धा देशभरात दर वाढल्याने वाढणारच आहे. फक्त तो महाराष्ट्राच्या तुलनेत कमी असेल. उरलेल्या १५७ डिझेल पंपातून वर्षाला २० कोटी लिटर इतके डिझेल लागणार असून सद्या एसटीला सरासरी ८८ रुपये प्रति लिटर दराने डिझेल खरेदी करावी लागत असून त्यात आता तीन रुपयांनी वाढ होणार आहे. तो दर आता प्रति लिटरला ९१ रुपये इतका होणार आहे.
राजस्थान, गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी कर
एसटी ही सार्वजनिक वाहतूक असल्याने तिला मदत व्हावी यासाठी राज्यस्थान सरकारने तिथल्या एसटीच्या इंधन दर खरेदी मूल्यवर्धित करात सूट दिली असून सध्या राज्यस्थानमध्ये १८. ५ टक्के इतका मूल्यवर्धित कर असला तरी तिथल्या एसटीला त्यात सूट मिळाली असून तो १४ टक्के इतका आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुद्धा एसटीला मूल्यवर्धित करातून सूट दिली पाहिजे अन्यथा १२००० कोटी रुपयांचा संचित तोटा व ५००० कोटी रुपयांची वैधानिक देणी रक्कम थकीत असलेल्या एसटीसाठी ही धोक्याची घंटा ठरेल असेही बरगे यांनी म्हटले आहे.



