थेट द्वितीय वर्ष Engineering Diploma प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई :

प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला २ जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, अनुदानित, विद्यापीठ संचालित तसेच खासगी विनाअनुदानित पदविका संस्थांमधील प्रवेशासाठीची ऑनलाईन नोंदणी २३ जूनपासून सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ६ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच वर्किंग प्रोफेशनल्स (कार्यरत व्यावसायिक) उमेदवारांच्या स्वतंत्र तुकडीच्या प्रवेश प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे.

दहावीनंतर दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी किंवा बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी, अभियांत्रिकी ग्राफिक्स आदी विषयांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्यामुळे आयटीआय व बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना २३ जूनपासून https://dsd26.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती ऑनलाईन अपलोड करणे, कागदपत्रांची प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करून अर्ज निश्चिती करण्यासाठी ६ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांसाठी ई-स्क्रूटनी आणि प्रत्यक्ष स्क्रूटनी असे दोन्ही पर्याय उपलब्ध ठेवले आहेत.

कार्यरत व्यावसायिकांसाठीही प्रवेशाची संधी
विविध कंपन्या व उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांनाही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्वतंत्र तुकडीत सुरू करण्यात आली आहे. कार्यरत व्यावसायिक हे संबंधित संस्थेच्या ५० किलोमीटर परिघातील नोंदणीकृत उद्योग, आस्थापना, सार्वजनिक किंवा खासगी क्षेत्रातील कंपनी अथवा एमएसएमईमध्ये कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे किमान एक वर्षाचा नियमित पूर्णवेळ कामाचा अनुभव असणे बंधनकारक आहे.

Engineering Diploma : प्रवेशासाठी शुल्क

ऑनलाइन अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्ग तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना ४०० रुपये शुल्क भरावे लागणार असून, राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, एसईबीसी, ईडब्ल्यूएस आणि दिव्यांग उमेदवारांसाठी हे शुल्क ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. शुल्काची भरपाई केवळ क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंगद्वारेच करता येईल.

Engineering Diploma : मोबाईल ॲपद्वारेही करता येणार अर्ज

पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://dsd26.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच ‘DTE Diploma Admission’ या मोबाईल ॲपवरूनही विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे.

हेही वाचा : Mangal Prabhat Lodha: किंग एडवर्ड हा कसाब सारखा, त्याचे समर्थन करणाऱ्यांचा धिक्कार

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक

  •  ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करणे : २३ जून ते ६ जुलै
  • तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे : ८ जुलै
  • तक्रारी व दुरुस्ती नोंदविण्याची मुदत : ९ ते १० जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १२ जुलै

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत