GSB Ganeshotsav : यंदा ७०३.२७ कोटी रुपयांचा ‘गणेशोत्सव विमा’
मुंबई :
जीएसबी सेवा मंडळ म्हणजेच ‘नवसला पावणारा विश्वाचा राजा’ महागणपतीचे यंदा ७२ वे वर्ष आहे. त्यामुळे मंडळाने यंदा तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचा ‘गणेशोत्सव विमा’ काढला आहे. तसेच यंदा ‘महागणपती’ला ६६ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने, ३३५ किलोहून अधिक चांदी आणि इतर मौल्यवान रत्नांनी सजविण्यात आले आहे.
जीएसबी सेवा मंडळ (GSB Seva Mandal) तर्फे महागणपतीच्या आगमनाचे ७२ वे वर्ष साजरे केले जात आहे. त्यानिमित्त यंदा मंडळाकडून तब्बल ७०३.२७ कोटी रुपयांचे ‘गणेशोत्सव विमा संरक्षण’ (Ganeshotsav Insurance Cover) काढण्यात आले आहे. यामध्ये गणपतीचा मंडप, गणेश मूर्ती, गणपतीचे दागिने, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गणेश भक्तांचा समावेश आहे. एक जबाबदार मंडळ म्हणून, महागणपतीच्या प्रत्येक भक्ताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हा विमा काढण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
१२ सप्टेंबर २०२६ रोजी ‘विराट दर्शन’ सोहळा रात्री ८ वाजता होणार आहे. १४ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशोत्सव साजरा केला जाईल. तसेच, जगभरातील भक्तांवर केलेल्या असंख्य चमत्कारांमुळे आणि असीम दैवी आशीर्वादांमुळे, महागणपती हे भक्तांकडून ‘नवसाला पावणारा विश्वाचा राजा’ म्हणून ओळखले जातात.
GSB Ganeshotsav : गणेशोत्सवात ‘गो ग्रीन’ उपक्रम
जीएसबी मंडळाकडून गणेशोत्सवामध्ये डिजिटल पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून, पारंपरिक आणि छापील पावत्यांची पद्धत बंद केली आहे. यामुळे कागदाचा अपव्यय टाळला जातो आणि पर्यावरणपूरक उत्सवाला चालना मिळते. या गणेशोत्सवात मंडळाकडून ‘गो ग्रीन’ (पर्यावरणपूरक) उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महागणपतीची मूर्ती पर्यावरणपूरक असून, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने मंडळाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे.
GSB Ganeshotsav : १ लाखांहून अधिक भाविक सेवा अर्पण करतात
जीएसबीच्या मंडपात सरासरी १ लाखांहून अधिक भाविक आणि सेवाधारी भगवान महागणपतीला पूजा व सेवा अर्पण करतात. शहरात एक शिस्तप्रिय आणि पारंपरिक मंडळाची ओळख आहे. येथे सर्व धार्मिक विधी (पूजा, अर्चना, सेवा, अन्नदान, तुलाभार, गणहोम इत्यादी) शास्त्रोक्त आणि वैदिक परंपरेनुसार पार पाडले जातात. दररोज ४० हजारांहून अधिक आणि ५ दिवसांत २ लाखांहून अधिक लोक ‘अन्नदान सेवे’चा लाभ घेतात. भाविकांना केळीच्या पानावर प्रसाद दिले जाते.
मौल्यवान रत्नांनी मूर्तीची सजावट
जीएसबी सेवा मंडळाच्या ‘महागणपती’ला ६६ किलोहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने, ३३५ किलोहून अधिक चांदी आणि इतर मौल्यवान रत्नांनी सजवले जाते; हे दागिने व वस्तू प्रामुख्याने भाविक किंवा सेवादारांकडून देणगी स्वरूपात प्राप्त होतात, अशी माहिती मंडळाचे संयोजक डॉ. भुजंग पै यांनी दिली.



