HBOT : सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी
जखमा बऱ्या होऊन रुग्णांन मिळणार दिलासा
मुंबई :
अपघात, मधुमेहाने झालेल्या जखमा किंवा शस्त्रक्रियेनंतर जखम बरी होण्यास अनेकदा वेळ लागतो. जखम बरी होण्यास जितका अधिक वेळ लागतो तितका मानसिक व शारीरिक त्रास रुग्णाला होत असतो. या जखमा अवघ्या काही दिवसांत बऱ्या झाल्यास रुग्णांना दिलासा मिळतो. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारने सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये गंभीर जखमा अवघ्या काही दिवसांमध्ये बरे करणारी हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लागणाऱ्या स्वतंत्र कक्षाची उभारणी रुग्णालयात झाली असून, लवकरच हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

एखाद्या अपघातामध्ये झालेली दुखापत, मधुमेहामुळे झालेली जखम, कर्करोगावरील रेडिएशन उपचारांमुळे झालेली ऊतींची हानी, शस्त्रक्रिया, गंभीर भाजलेल्या जखमा या पूर्णपणे बरे होण्यासाठी महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी लागतो. अनेकदा या जखमा चिघळतात. त्यामुळे रुग्णांना अधिक त्रास होतो. चिघळणाऱ्या जखमांमुळे अनेकदा रुग्ण मानसिक तणावाखाली वावरत असतात. अशावेळी रुग्णांना जर एचबीओ थेरपी मिळाल्यास रुग्णांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास कमी होण्यास मदत होते. ही थेरपी सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. रुग्णांना ४५ ते १२० मिनिटांपर्यंत ही थेरपी दिली जाते. रुग्ण आरामात बसून किंवा झोपून हे उपचार घेऊ शकतात. त्यामुळे रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. या उपचार पद्धतीमुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होऊन त्यांना दिलासा मिळणार असल्याचे सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले. या उपचार पद्धतीदरम्यान, दाबामुळे कानात वेदना किंवा किरकोळ इजा होण्याची शक्यता असते. तसेच सायनसचा त्रास, तात्पुरता दृष्टीतील बदल असे त्रास होण्याची शक्यता असते.
एचबीओटी केंद्र बनवून तयार झालेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये या केंद्राचे लोकार्पण करण्यात येईल. या उपचार पद्धतीसाठी जे.जे. रुग्णालयामध्ये एक हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये किती शुल्क आकारावे याबाबत विचार सुरू आहे. तसेच ही उपचार पद्धती महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करण्याबाबतही प्रयत्न सुरू असल्याचेही डॉ. सावर्डेकर यांनी सांगितले.
HBOT : हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी म्हणजे काय?
एचबीओ उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला विशेष दाबयुक्त कक्षात १०० टक्के शुद्ध ऑक्सिजन दिला जातो. सामान्य वातावरणापेक्षा सुमारे २ ते ३ पट अधिक दाबाखाली ऑक्सिजन घेतल्यामुळे रक्तामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. त्यामुळे ऊतींना अधिक ऑक्सिजन मिळून जखम भरून येण्यास मदत होते, सूज कमी होऊ शकते आणि काही विशिष्ट संसर्गांवर उपचारास सहाय्य मिळते. ही उपचार पद्धती शरीराला नवीन त्वचा, रक्तवाहिन्या आणि संयोजी ऊती तयार करण्यास मदत करून खराब झालेल्या ऊतींना बरे करते.
वृद्धत्वविरोधी उपचारांसाठीही वापर
एचबीओटी शरीराला अधिक कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे त्वचेची लवचिकता सुधारते . बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा एकूणच अधिक तरुण दिसते.



