Mard strike : डॉक्टरांच्या बंदमुळे रुग्णांच्या संख्येत घट

मुंबई :

सीसीएमपी पात्रता प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीची प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्यात यावी, उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णयापर्यंत कोणतीही पुढील कार्यवाही करू नये, निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने तातडीने चर्चा करावी यासाठी मार्डने बुधवारपासून बंद पुकारला आहे. या बंदचा रुग्णसेवेवर फारसा परिणाम झाला नसला तरी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले.

Mard strike - Voice of eastern
सीसीएमपी विरोधात आंदोलन करताना निवासी डॉक्टर

जे.जे. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे १ हजार ७३५ रुग्ण हे बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. मात्र बुधवारच्या बंदमुळे जे.जे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी असलेल्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली होती. बाह्यरुग्ण विभागामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत १ हजार ३३३ इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच दररोज साधारणपणे १०२ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र बुधवारी फक्त ३९ रुग्णांनाच दाखल करण्यात आले. बंदचा परिणाम शस्त्रक्रियांवर झाला असल्याचे दिसून आले. दररोज साधारणपणे ३९ शस्त्रक्रिया केल्या जातात, मात्र बुधवारी फक्त ४ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती जे.जे. रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

नायर रुग्णालयामध्येही रुग्ण संख्येमध्ये घट झाल्याचे दिसून आले. नायरमध्ये दररोज साधारणपणे दोन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. मात्र बुधवारी फक्त १ हजार १३२ रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागामध्ये झाले. त्याचप्रमाणे दररोज ४० लहान, मोठ्या शस्त्रक्रिया होत असताना बुधवारी फक्त २९ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

Mard Strike : बंदचा रुग्णसेवेवर फारसा परिणाम नाही

शीव रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागामध्ये बुधवारी १ हजार १२७ रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी आले. मात्र दररोज साधारणपणे २ हजार ७०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे शीव रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या संख्येत तब्बल १५०० पेक्षा जास्त घट झाली. त्याचप्रमाणे रुग्णालयामध्ये दररोज २०० च्या आसपास शस्त्रक्रिया होत असताना बुधवारी फक्त १२० शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली. तसेच कूपर रुग्णालय हे पश्चिम उपनगरातील रुग्णांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे समजले जाते. या रुग्णालयामध्ये दररोज एक हजारपेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र बुधवारी फक्त ६७६ रुग्णांची नोंद बाह्यरुग्ण विभागामध्ये झाल्याची माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी दिली.

हेही वाचा : Job fairs : राज्यात १ हजार रोजगार मेळाव्यांचे आयोजन – मंत्री मंगलप्रभात लोढा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत