Mumbai University : चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
मुंबई :
मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग आणि स्वायत्त महाविद्यालयातील चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० जूनपासून सुरूवा झाली असून, विद्यार्थ्यांना २८ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक पदव्युत्तर विभागात तसेच स्वायत्त महाविद्यालयात पदवीचे चौथे वर्ष ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्चचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार या अभ्यासक्रमाचे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार २० ते २८ जून दरम्यान ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाद्वारे ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी २९ जूनला पूर्ण केली जाणार असून ३० जून रोजी तात्पूरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. १ जुलै ते २ जुलै दरम्यान ऑनलाईन शूल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. द्वितीय गुणवत्ता यादी ३ जुलैला जाहीर केली जाणार असून ३ ते ४ जुलै दरम्यान ऑनलाईन शूल्क अदा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ज्या विद्यार्थ्यांनी पदवीचे तीन वर्षे पूर्ण केलेत अशा विद्यार्थ्यांना चौथ्या वर्षासाठी (ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च) साठी प्रवेश घेता येईल. मुंबई विद्यापीठाच्या https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थवळावर जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
Mumbai University : स्वायत्त महाविद्यालयांनी वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी
चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांचे सर्व प्रवेश आणि त्यांचे शैक्षणिक उपक्रम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांनी वेळोवेळी घालून दिलेल्या तरतूदी आणि मार्गदर्शक तत्वानुसार होतील. मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयांनी निर्गमित केलेल्या या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवावी. तसेच महाविद्यालयांकडे असलेल्या प्रवेश क्षमतेनुसार, आरक्षणाचे नियम व तरतूद आणि अभ्यासक्रमांच्या पात्रतेनुसार ४ जुलै पूर्वी किंवा पर्यंत प्रवेश प्रक्रिया राबवावी असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : NEET-UG re-examination : दोन लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज
एआयसीटी अंतर्गत असलेल्या एमएमएस, एमसीए, एमटेक आणि एमई या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही सीईटी सेलमार्फत घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालानंतर राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.



