Cama Hospital : कामा रुग्णालयात बाह्यरुग्णांसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा

कामा रुग्णालयात बाह्यरुग्णांसाठी ऑनलाइन पेमेंट सुविधा; रोख रक्कम भरताना होणाऱ्या त्रासातून सुटका होणार

मुंबई :

कामा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांना नोंदणी करण्यापासून विविध उपचारासाठी शुल्क भरावे लागते. अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे सुटे पैसे नसतात, सुट्ट्या पैशांसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. ही धावपळ कमी करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासनाने रुग्णांना डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे रुग्णांना सर्वच शुल्क ऑनलाईन भरता येणार असून त्यांचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे voice of eastern
कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे

कामा रुग्णालयामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरातून मोठ्या प्रमाणात महिला उपचारासाठी व प्रसूतीसाठी येत असतात. या महिलांना नोंदणी करण्यापासून विविध उपचारांसाठी शुल्क भरावे लागते. हे शुल्क २० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असते. सीटी स्कॅन व एमआरआयचे शुल्क हे जास्त असते. अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडे रोख रक्कम नसते. परंतु रुग्णालयातील रोख भरणा खिडकीवर रोख पैसेच स्वीकारले जातात. त्यामुळे अनेकदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना रोख रक्कम आणण्यासाठी रुग्णाबाहेरील एटीएम केंद्रांकडे धाव घ्यावी लागते. त्यानंतरही सुट्या पैशांवरून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे रोख भरणा खिडकीवरील संबंधित व्यक्तीशी खटके उडतात. ही बाब लक्षात घेत कामा रुग्णालय प्रशासनाने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी नोंदणी शुल्क, सल्ला शुल्क आणि इतर बाह्यरुग्ण शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे रांगा लावण्याचा तसेच रोख पैशांची व्यवस्था करण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली.

Cama Hospital : ऑनलाइन आणि क्युआर कोड पेमेंटचा पर्याय उपलब्ध

जीटी रुग्णालय व मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जीतेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही डिजिटल पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे. सर्व बाह्यरुग्ण सेवांसाठी ऑनलाइन आणि क्युआर कोड पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. रुग्णसेवा अधिक सुलभ आणि त्रासरहित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे रोख भरणा खिडकीवरील रांगा कमी होण्याबरोबरच डॉक्टरांकडील प्रतीक्षा कालावधी कमी करण्यास मदत होईल, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

हेही वाचा :  Chemotherapy : शताब्दी रुग्णालयात केमोथेरपी सेवा सुरू होणार

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत