CCMP : सीसीएमपी धारकांची एमएमसीमध्ये नोंदणी सुरु; आयएमएचा विरोध
मुंबई :
आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (एमएमस) नोंदणी करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानंतर २४ ऑगस्टपासून या प्रक्रियेला प्रत्यक्षरित्या सुरुवात झाली. सोमवारी दोन डॉक्टरची नोंदणी करून प्रमाणपत्र देण्यात आले. यामुळे एमएमसीकडे अर्ज केलेल्या ४ हजार ५०० डॉक्टरांच्या नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या नोंदणीविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्रमक पवित्रा घेत जोरदार विरोध केला. तसेच थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रधान सचिव धीरज कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांची एमएमसीमध्ये नोंदणी करण्यासंदर्भात राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) आणि आयएमएच्या महाराष्ट्र शाखेकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्यासाठी मार्ड व आयएमएकडून काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची न्यायालयाने दखल घेत याचिका दाखल करून घेतली होती. या सुनावणीमध्ये आयएमए आणि मार्ड डॉक्टर संघटनांच्या मतांचा विचार करून मानक कार्यप्रणाली तयार करण्याचेही निर्देश विभागाला देण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही दिवसांतच शिक्षण विभागाने परिपत्रक काढत होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश एमएमसीला दिले. या निर्देशानुसार एमएमसीने सोमवारपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली. त्यानुसार राजश्री मेमाणे व मयुरेश कांबळे या दोन डॉक्टरांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची नोंदणी करत त्यांना प्रमाणपत्र जाहीर करण्यात आले.
CCMP : ४ हजार ५०० डॉक्टरांच्या नोंदणीचा मार्ग मोकळा
२०१४ मध्ये कायद्यात दुरुस्ती करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करता यावा यासाठी सीसीएमपी अभ्यासक्रम सुरू केला. मागील १२ वर्षांमध्ये ९ हजार ९७२ होमिओपॅथी डॉक्टरांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. यातील ४ हजार ५०० डॉक्टरांनी एमएमसीकडे नोंदणीसाठी अर्ज केला आहे. नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याने या डॉक्टरांच्या नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
CCMP : अवमान याचिकेचा आयएमएचा इशारा
सीसीएमपी प्रमाणपत्र धारक डॉक्टरांची नोंदणी प्रक्रिया एमएमसीने तातडीने थांबवली नाही, तर आयएमएच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा आयएमएने प्रसिद्धीपत्रकातून देण्यात आला आहे. तसेच शासनाने यावर तातडीने योग्य निर्णय न घेतल्यास आयएमएकडून संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने पुन्हा राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
वैद्यकीय शिक्षण विभागाने एमएमसीला आदेश देताना केलेला गलथानपणा आणि न्यायालयाच्या निर्देशांचा केलेला अनादर या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व प्रधान सचिव यांनी धीरज कुमार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही आयएमएने केली आहे.



