ST: स्वच्छता अधिभारामुळे ज्येष्ठ नागरिक व वाहकामध्ये वाद
मुंबई –
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांकडून आजपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार सुरू करण्यात आला आहे. सुट्या पैशावरून अनेक ठिकाणी वाद निर्माण होत असून अमृत ज्येष्ठ नागरिक व वाहकांमध्ये वादावादी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अधिभार संदर्भात काहीतरी मध्य मार्ग काढण्यात आला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
ST : प्रवाशांकडून दोन रुपये स्वच्छता अधिभार अतिरिक्त वसूल
एसटीच्या प्रत्येक प्रवाशांकडून आज रात्रीपासून दोन रुपये स्वच्छता अधिभार अतिरिक्त वसूल करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे. दररोज साधारण अडीच लाख अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवास करीत असून त्यांना आता दोन रुपये अधिभार लागणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ही नक्कीच चांगली बाब आहे. त्याला विरोधही नाही. पण अमृत जेष्ठ नागरिक प्रवाशांना शासनाने यापूर्वी तिकीट भाड्यात शंभर टक्के सवलत दिलेली असली असल्याने ते दोन रुपये अतिरिक्त देण्यास टाळाटाळ करीत आहेत. परिणामी वाद निर्माण होत आहेत.

याला पर्याय म्हणून यूपीआय पेमेंट घेऊन हा प्रश्न सोडविण्यात मदत होते ,पण गेले आठवडा सर्वर डाऊन असल्याने प्रवाशांच्या खात्यातून पैसे कट होतात ते एसटीच्या खात्यात जमा होण्यात अडचणी येत आहेत. परिणाम मशीन मधून तिकीट निघण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे दोन रुपयांचा अधिभार वसूल करण्यावरून जेष्ठ नागरिक व वाहकामध्ये शाब्दिक खडाजंगी होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही सद्या महामंडळाच्या गाड्यांच्या स्वच्छते बाबतीत दररोज प्रवासी तक्रारी होत आहेत. या एसटीची बदनामी सुद्धा होत आहे. त्यामुळे महामंडळाची ही स्वच्छता योजना चांगली असली तरी दोन रुपये वसूल करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे यातून काही मध्य मार्ग काढण्यात यावा असेही बरगे यांनी म्हटले आहे.


