नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर – लोढा यांची खंत
सेवा संकल्प अभियानातंर्गत ‘ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रम संपन्न; ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद

मुंबई :
नशेचे व्यसन शरीरात आणि मनात शिरले, तर त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. कितीही उपचार केले तरी त्याचे परिणाम अनेकदा आयुष्यभर वेदना देऊन जातात. म्हणून नशा हा शरीर आणि समाजाला पोखरणारा कॅन्सर आहे, अशी खंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली. त्यामुळे नशेपासून स्वतःला आणि आपल्या पुढील पिढीला दूर ठेवण्यासाठी त्याविरोधात एकत्रितपणे लढणे ही काळाची गरज आहे. त्याकरिता गुड टच आणि बॅड टच प्रमाणेच आता ‘गुड फ्रेंड’ आणि ‘बॅड फ्रेंड’ यातील फरक समजून मुलांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचे आवाहन लोढा यांनी शिक्षक आणि पालकांना केले.

सांताक्रुझ पुर्वेकडील कलिना कॅम्पस् येथील मुंबई विद्यापीठाच्या ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम येथे बुधवारी ‘सेवा संकल्प अभियानातंर्गत ड्रग्स फ्री मुंबई – विद्यार्थी समुपदेशन सत्र व शिक्षण प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानामध्ये शाळा, महाविद्यालय, संस्था व संघटना आणि पोलीस प्रशासन इत्यादींनी उत्तम कामगिरी केली. अशा २१ जणांचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली.
मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाची सुरुवात ३० जुलै रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते झाली. हे अभियान वर्षभर सुरू राहणार आहे. नशेद्वारे गुन्हेगारी प्रवृत्ती पण समाजात प्रवेश करत आहे, त्याचा ही धोका ओळखा? आज युद्धाची परिभाषा बदलली आहे. तलवार, बंदुक, बॉम्ब किंवा अणुबॉम्बऐवजी नकली नोटा छापून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करणे किंवा त्या देशातील युवा पिढीला नशेच्या आहारी लावणे, हीदेखील मोठी आव्हाने आहेत. कारण एखाद्या कुटुंबातील युवक व्यसनाच्या आहारी गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.
मुंबईचा विकास होत असताना मुंबईला नशेपासून सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. युवकांनी नशेपासून दूर राहावे आणि ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाला प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहन मंगलप्रभात लोढा यांनी केले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या सहायक प्राध्यापक डॉ. साईगीता चित्तूरू यांनी ‘किशोरावस्था’ या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रम्हकुमारी प्रशांती यांनी ‘Be Smart Be Strong Within’ याविषयावर मुलांना मार्गदर्शन केले. तसेच डिवाईन टच संस्थेच्या प्रतिनिधींनी चांगल्या गोष्टींची योग्य ‘निवड’ कशी करावी, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हेही वाचा : Seva First Innovation Challenge : शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घ्यावा – लोढा
याप्रसंगी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पोलीस अधिकारी, संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



