TET : परीक्षेत चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर निर्बंध
हिजाब, बुरखा, दुपट्ट्याबाबत परीक्षा परिषदेचा खुलासा
मुंबई :
परीक्षा केंद्रांवरील सर्व वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही निरीक्षण व्यवस्था असणार असल्याने परीक्षार्थ्यांचा संपूर्ण चेहरा स्पष्ट दिसणे बंधनकारक आहे. त्यामुळे वर्गखोलीमध्ये मानेच्या वरच्या भागावर, म्हणजे डोक्यावर, कानांवर, तोंडावर किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा आवरण ठेवता येणार नसल्याचे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी आयोजित केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) महिला उमेदवारांना हिजाब, बुरखा व दुपट्टा वापरण्यास बंदी घातली होती. या निर्णयाला स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ)च्या महाराष्ट्र दक्षिण विभागाने विरोध करत परिषदेला पत्र पाठवून ही अट मागे घेण्याची मागणी केली होती. परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गैरप्रकारांना आळा घालण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा असला, तरी त्यासाठी विद्यार्थ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येऊ नये, असे संघटनेचे म्हणणे आहे. यावर परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परीक्षेतील पारदर्शकता, उमेदवारांची ओळख पडताळणी आणि गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
TET : देशातील विविध परीक्षांमध्येही निर्बंध
देशातील यूपीएससी, एसएससी, आयबीपीएस, एसबीआय, आरआरबी, गेट, क्लॅट, सीए, सीएस, सीएमए यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील तसेच विविध राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्येही चेहरा झाकणारे कपडे, स्कार्फ, टोपी, गॉगल्स आदींवर निर्बंध असतात. बायोमेट्रिक पडताळणी, ओळख तपासणी आणि सीसीटीव्ही निरीक्षणासाठी हे आवश्यक असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे.
सध्या परीक्षांमध्ये मोबाईल फोन, ब्लूटूथ उपकरणे, वाय-फाय आधारित सूक्ष्म साधने तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून गैरप्रकार करण्याचे प्रकार वाढले असल्याचे परिषदेने निदर्शनास आणले आहे. काही उमेदवारांनी अलीकडील डीएलएड आणि संगणक लघुलेखन परीक्षांमध्ये दुपट्टा किंवा बुरख्यामध्ये मोबाईल लपवून आणल्याचेही निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. चेहरा किंवा तोंड झाकलेले असल्यास संवाद साधणे, संशयास्पद हालचाली अथवा अन्य गैरप्रकार ओळखणे कठीण होऊ शकते, असेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
हेही वाचा : certificates at school : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार दाखले
दरम्यान, महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य कायम राहील; मात्र परीक्षा कालावधीत वर्गखोलीमध्ये बसताना चेहरा पूर्णपणे उघडा असणे आवश्यक राहील. मानेच्या वरच्या भागावर, म्हणजे डोक्यावर, कानांवर, तोंडावर किंवा चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे कपडे अथवा आवरण ठेवता येणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.



