Kabaddi : कबड्डीच्या पंढरीत दिग्गजांना मानवंदना
खेळाडूंच्या घामाने पावन झालेल्या श्रमिक जिमखान्याचा शनिवारी आपुलकीचा सोहळा
मुंबई –
तबेल्यापासून कबड्डीच्या पंढरीपर्यंतचा प्रवास, घामाने निथळलेली माती, संघर्षाने घडलेले खेळाडू आणि जिवापाड जपलेली परंपरा. या सर्वांच्या साक्षीने उभा असलेला श्रमिक जिमखाना आता आपल्या हिरक महोत्सवात त्या प्रत्येक हाताला, प्रत्येक पावलाला आणि प्रत्येक श्वासाला कृतज्ञतेचा मुजरा करणार आहे.
येत्या शनिवारी ११ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता अमरप्रेम क्रीडा मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारा हा सोहळा केवळ कार्यक्रम नाही, तर कबड्डीच्या मातीत रुजलेल्या असंख्य आठवणींना उजाळा देणारा भावनिक क्षण ठरणार आहे. आमदार सुनील शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेली ही कृतज्ञतेची चढाई म्हणजे कबड्डीप्रेमाचा अस्स्ल कौटुंबिक सोहळा असेल.

मुंबईसाठी जशी वानखेडे स्टेडिमय क्रिकेटची पंढरी, तसेच श्रमिक जिमखाना कबड्डीचे तीर्थक्षेत्र. या पवित्र भूमीवर पहिले अर्जुनवीर सदानंद शेट्येंपासून ते आजच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांपर्यंत सर्व दिग्गजांना एकाच मंचावर आणून सन्मानित केले जाणार आहे. महिला आणि पुरुष गटातील संघनायक- संघनायिकांचा गौरवही या सोहळ्याची शान वाढवणार आहे. खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे हाडवैद्य, प्रशिक्षक, पत्रकार आणि चाहते, या सर्वांचा सन्मान म्हणजे कबड्डी कुटुंबाच्या एकजुटीची जाणीव करून देणारा क्षण असेल.
पडद्यामागील शिल्पकारांचाही सन्मान
कबड्डीचा वारसा जपणार्या संस्थांनाही मानाचा मुजरा दिला जाणार आहे. आर्य सेवा मंडळ, शिवनेरी सेवा मंडळ आणि अमर क्रीडा मंडळ, दादर यांच्यासारख्या संस्थांनी जपलेली परंपरा आणि त्यांचे योगदान यावेळी उजळून निघणार आहे. तसेच मैदान उभारणारे, रेषा आखणारे अशोक गुरव यांच्यासारख्या पडद्यामागील शिल्पकारांनाही योग्य सन्मान मिळणार आहे. चार दशकांहून अधिक काळ खेळणारे विलास जाधव, ‘टायगर’ वसंत सूद, चषक निर्माते हरीश परब, तसेच खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारे हाडवैद्य, प्रशिक्षक, पत्रकार आणि चाहते, या सर्वांचा सन्मान म्हणजे कबड्डी कुटुंबाच्या एकजुटीची जाणीव करून देणारा क्षण असेल.
गौरव नव्हे kabaddi चा वारसा सुपूर्द करण्याचा संकल्प
आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी पोहोचवणार्या हिंदमाता सेवा मंडळ आणि मुंबईत पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा आयोजित करणार्या साऊथ कॅनरा क्रीडा मंडळ यांचाही गौरव होणार आहे. हा सोहळा म्हणजे केवळ भूतकाळाचा गौरव नाही, तर पुढील पिढीकडे कबड्डीचा वारसा प्रेमाने आणि अभिमानाने सुपूर्द करण्याचा भावनिक संकल्प आहे. निमंत्रक आमदार सुनील शिंदे कौटुंबिक सोहळ्यानिमित्त क्रीडाप्रेमींना कबड्डीप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करत, या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याचे निमंत्रण दिले आहे.



