UG admission : वैद्यकीय समुपदेशन अर्जातील चुका सुधारण्याची विद्यार्थ्यांना संधी
UG admission
मुंबई :
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीसाठी ५ जुलैपासून सुरूवात झाली आहे. मात्र या नोंदणीदरम्यान अनेक विद्यार्थी अर्ज भरता चुका करतात. त्यामुळे पुढील प्रक्रियेमध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या (आयएमए) वैद्यकीय समुपदेशन समितीने (एमसीसी) विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी लॉगिनमध्ये नोंदणी दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत नोंदणी अर्जातील तपशील दुरुस्त करता येणार आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली फेरी ५ ते २२ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार ५ ते १२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी आणि शुल्क भरायचे आहे. मात्र ऑनलाईन अर्ज नोंदणी करताना अनेक विद्यार्थ्यांकडून अनवधानाने चुकीची माहिती भरली जाते. यामुळे त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय समुपदेशन समितीने विद्यार्थ्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी लॉगिनमध्ये नोंदणी दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनवधानाने चुकीची माहिती भरलेल्या विद्यार्थ्यांना ‘नोंदणी दुरुस्ती’चा पर्याय एमसीसीकडून उपलब्ध करण्यात आला आहे. या पर्यायाचा वापर करून १२ ऑगस्टपर्यंत सकाळी ११ वाजेपर्यंत विद्यार्थी आपल्या नोंदणीच्या तपशीलामध्ये सुधारणा करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पर्यायाचा वापर करत दिलेल्या मुदतीपूर्वी नोंदणी अर्जामध्ये आवश्यक बदल करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन एमसीसीकडून करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेतील सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.mcc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देण्याचा सल्ला एमसीसीकडून देण्यात आला आहे.
UG admission : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या समुपदेशानाची पहिली फेरी ५ ते २२ ऑगस्टदरम्यान राबविण्यात येणार आहे. ५ ते १२ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी, आणि शुल्क भरायचे आहे. ६ ते १३ ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरून अर्ज निश्चित करायचा आहे. १७ ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. १८ ते २२ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय कोट्याच्या दुसरी समुपदेशन फेरी २४ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना ३ ते ८ सप्टेंबर या कालावधती प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. तिसरी समुपदेशन फेरी ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान असून, विद्यार्थ्यांना १९ ते २६ या कालावधीत महाविद्यालयात प्रवेश घ्यायचे आहेत. वेळापत्रकादरम्यान शनिवार, रविवार आणि अन्य सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या तसेच वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना एनएमसीकडून सर्व वैद्यकीय महाविद्यालये व संस्थांमधील समुपदेशन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.



