Robotic telesurgery : २२ हजार किमी अंतरावरून जगातील पहिली रोबोटिक टेलीसर्जरी
मुंबई :
भारतीय डॉक्टरांचे अद्वितीय कौशल्य आणि स्वदेशी रोबोटिक तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक वैद्यकीय क्षेत्रात भारताने एक नवा इतिहास रचला आहे. ‘एसएस इनोवेशन्स इंटरनॅशनल’ या कंपनीच्या पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ ‘एसएसआय मंत्रा’ सर्जिकल रोबोटिक प्रणालीच्या मदतीने कोलंबियातून तब्बल २२ हजार किलोमीटर दूर बसलेल्या शल्यचिकित्सकांनी इंदूरमधील एका रुग्णावर यशस्वी ‘रोबोटिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी’ शस्त्रक्रिया पूर्ण केली आहे.
ही ऐतिहासिक टेलीसर्जरी कोलंबियातील हॉस्पिटल इंटरनॅशनल डी कोलंबिया आणि इंदूर येथील मोहक बॅरियाट्रिक्स अँड रोबोटिक्स दरम्यान सुमारे २२ हजार किलोमीटर लांबीच्या फायबर नेटवर्कद्वारे यशस्वीरीत्या पार पडली. या दूरस्थ शस्त्रक्रियेचे नेतृत्व कोलंबियातून एसएस इनोवेशन्सचे संस्थापक, अध्यक्ष व सीईओ डॉ. सुधीर श्रीवास्तव यांनी डॉ. व्हिक्टर राऊल कॅस्टिलो मँटिला आणि डॉ. जोनाथन कासेरेस प्राडा यांच्यासह केले. तर इंदूरमध्ये प्रत्यक्ष रुग्णासोबत उपस्थित असलेल्या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध बॅरियाट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी आणि डॉ. अभिषेक तिवारी यांनी केले.

ही संपूर्ण गुंतागुंतीची प्रक्रिया अवघ्या २७५–२८५ मिलीसेकंद नेटवर्क लेटन्सी (राउंड ट्रिप टाइम) वर पार पडली, ज्याने जागतिक स्तरावर एसएसआय मंत्रा प्लॅटफॉर्मची अचूकता, स्थिरता आणि विश्वासाची नवी व्याख्या स्पष्ट केली आहे.
Robotic telesurgery : गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी भौगोलिक अंतराचा अडथळा दूर
या ऐतिहासिक यशामुळे अत्याधुनिक व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी भौगोलिक अंतर आता अडथळा राहिलेले नाही. परदेशी रोबोटिक प्रणालींच्या तुलनेत एसएसआय मंत्राही पूर्णपणे स्वदेशी, अत्यंत परवडणारी आणि सुलभ प्रणाली आहे. यामुळे ग्रामीण आणि टियर-२, टियर-३ शहरांतील रुग्णांना मोठ्या महानगरांमध्ये न जाता स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे उपचार मिळणे शक्य होणार आहे. या अद्वितीय यशाबद्दल बोलताना एसएस इनोवेशन्सचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ डॉ. सुधीर श्रीवास्तव म्हणाले, “कोलंबिया आणि भारतादरम्यान यशस्वीरीत्या पार पडलेली ही टेलीसर्जरी सिद्ध करते की, दर्जेदार उपचारांसाठी आता अंतर अडथळा ठरू शकत नाही. जगभरातील रुग्णालयांसाठी अत्यंत परवडणारे आणि जागतिक दर्जाचे ‘मेड इन इंडिया’ रोबोटिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.”
Robotic telesurgery : विस्तार वेगाने होईल
मोहक बॅरियाट्रिक्स अँड रोबोटिक्सचे संस्थापक व संचालक डॉ. मोहित भंडारी म्हणाले, “ही शस्त्रक्रिया दाखवून देते की रोबोटिक टेलीसर्जरी भविष्यातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणेल. एसएसआय मंत्राच्या परवडणाऱ्या किंमतीमुळे भारतच नव्हे, तर जगभरातील विकसनशील देशांमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियांचा विस्तार वेगाने होईल.” अत्याधुनिक रोबोटिक्स, हाय-स्पीड नेटवर्क आणि भारतीय डॉक्टरांच्या कौशल्यामुळे भारत आता जागतिक स्तरावर ‘रोबोटिक सर्जरी हब’ म्हणून उदयास येत असल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे.



