सीए इंटरमिजिएट परीक्षेत मुंबईचा नील शहा आणि नाशिकची साक्षी चंदक देशात अव्वल

मुंबई :
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत मुंबईचा नील शहा आणि नाशिकची साक्षी यांनी प्रत्येकी ५०२ गुणांसह ८३.६७ टक्के मिळवत देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला.
चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या प्रक्रियेतील सीए इंटरमिजिएट परीक्षा ही महत्त्वाची परीक्षा आहे. आयसीएआयने जाहीर केलेल्या निकालानुसार, यंदाच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. मुंबईचा नील शहा आणि नाशिकची साक्षी यांनी प्रत्येकी ५०२ गुणांसह ८३.६७ टक्के मिळवत देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तसेच चेन्नईची श्रुती व्ही. हिने ४९२ गुणांसह ८२ टक्के गुण मिळवत देशात द्वितीय क्रमांक मिळवला, तर सुरतचा प्रेम अग्रवाल ४९० गुण आणि ८१.६७ टक्क्यांसह तृतीय क्रमांकावर राहिला.
सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट परीक्षेत १४ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गट १ मधून १ लाख ३०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २३ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गट १ चा उत्तीर्णतेचा दर २३.१४ टक्के आहे. त्याचप्रमाणे गट २ मधून ६८ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १२ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाचा निकाल १८.९२ टक्के इतका लागला आहे. दोन्ही गटातून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ३३९ होती. त्यापैकी ५ हजार ६६ उमेदवार उत्तीर्ण झाले. या गटाचा उत्तीर्णतेचा दर १३.२१ टक्के आहे.


