Carrom : ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६

मुंबई :

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन दिनांक २९ व ३० जानेवारी २०२६ दरम्यान श्री हालरी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, रणजीत स्टुडिओ समोर, दादासाहेब फाळके रोड, दादर ( पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथे करण्यात आले आहे. खुल्या गटात हि स्पर्धा खेळवण्यात असल्याने पुरुष व महिला प्रथमच एकत्रित या स्पर्धेत खेळणार आहेत. महाराष्ट्राशिवाय, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, बंगाल, गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पॉंडिचेरी, ओरिसा व झारखंड अशा एकंदर १७ राज्यातून खेळाडू सहभागी होणार आहेत. शिवाय भारताबाहेरून कॅनडा, श्रीलंका व मालदीव या देशातील खेळाडू स्पर्धेत सहभागी होत आहेत.

भारतीय आयुर्विमा महामंडळ या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून इंडियन ऑइल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, यूनियन बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, मड जीन्स आणि बार्बेक्यू नेशन यांचा पुरस्कार या स्पर्धेला लाभला आहे. तर सिस्का कॅरम कंपनी या स्पर्धेचे साहित्य पार्टनर आहेत. सिस्का कॅरम कंपनीचे एकंदर ४८ शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा वापर या स्पर्धेत करण्यात येणार आहे. प्रत्येक सहभागी खेळाडूला टी शर्ट / गणवेश देण्यात येणार असून स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारिणी काम करत आहे.

पहिल्या दिवशी सकाळी ९ वाजता स्पर्धा सुरु होणार असून त्यानंतर एकंदर १० सत्रे व दुसऱ्या दिवशी ६ सत्रांमध्ये सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना एकंदर ८ लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी १ लाख ५० हजार व चषक, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख व चषक, तृतीय क्रमांकासाठी ७५ हजार व चषक तर चौथ्या क्रमांकासाठी ५० हजरांचे बक्षिसे देण्यात येणार आहे. उपउपान्त्य फेरीसाठी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी १० हजार व उपउपांत्य फेरी पूर्व अगोदर हरणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी ५ हजारांचे रोख बक्षीस असे एकंदर ३२ खेळाडूंना ईनाम देण्यात येणार आहे.

पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी १ हजार, तर उपउपांत्य फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूला २ हजारांचे पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेत खेळणाऱ्या महिलांना उत्तेजन देण्यासाठी पहिला सामना जिंकणाऱ्या महिला खेळाडूस १ हजार, २ सामना जिंकणाऱ्या महिला खेळाडूला २ हजार, ३ सामना जिंकणाऱ्या महिला खेळाडूस ४ हजार, ४ वा सामना जिंकणाऱ्या महिला खेळाडूस ८ हजार व ५ वा सामना जिंकणाऱ्या खेळाडूस १५ हजारांची अतिरिक्त रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहा बोर्डाचे ३ सेट खेळवण्यात येणार असून प्रतिस्पर्ध्याच्या सोंगटीला थेट स्ट्रायकर लावण्यास व कठीण करण्यास मज्जाव असल्याने कॅरम खेळाडूंची खरी कस लागणार आहे व कॅरम रसिकांना अधिक आक्रमक खेळाचा आनंद लुटता येणार आहे.

सहभागी होणारे Carrom खेळाडू

महाराष्ट्रातील विश्व् विजेते योगेश परदेशी, संदीप दिवे, विद्यमान विश्व् कप विजेता प्रशांत मोरे तर तेलंगणाचा माजी विश्व कप विजेता के. श्रीनिवास या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे. याशिवाय आय सी एफ कप विजेता महाराष्ट्राचा रियाझ अकबर अली व विदर्भाचा इर्शाद अहमद आणि फेडरेशन कप विजेता तेलंगणाचा जनार्धन रेड्डीच्या आणि कर्नाटकचा राष्ट्रीय विजेता झहीर पाशा, उत्तर प्रदेशाचा महम्मद आरिफ, तामिळनाडूचा आर. आरोक्यराज सारख्या नामांकित खेळाडूंच्या सहभागामुळे सामन्यात अधिक चुरस निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे आंतर राष्ट्रीय खेळाडू महम्मद घुफ्रान, संदीप देवरुखकर, योगेश धोंगडे, अभिजित त्रिपनकर, प्रकाश गायकवाड, जितेंद्र काळे, दिलेस खेडेकर व महिला खेळाडू काजल कुमारी, आकांक्षा कदम, अंबिका हरिथ व संगीता चांदोरकर तसेच पॉंडिचेरीची वी. पूजा या स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत.

कॅनडाचा लुईस फेर्नांडीस, श्रीलंकेचा अनास अहमद, शाहिद हिलमी व महिला खेळाडू रोशिता जोसेफ, हिरूशी मालशानी, तशमीला काविंदी तसेच मालदिवजचे इस्माईल आझमीन व इब्राहिम हुज्जन अली सारखे आंतर राष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार असल्याने स्पर्धेची रंगात वाढली आहे. स्पर्धेच्या सभागृहात होणारी गर्दी लक्षात घेता एकावेळी दोन सामने स्क्रीनवरून दाखविण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय कॅरम असोसिएशनच्या युट्युब चनलवरून एका वेळी ६ सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून प्रसन्ना संत व मंदार बर्डे हे मराठी, इंग्रजी व हिंदीतून सामन्यांचे धावते समालोचन करणार आहेत. स्पर्धेकरिता चंदीगडचे आंतर राष्ट्रीय पंच महेश सेखरी यांची तांत्रिक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आंतर राष्ट्रीय पंच आशिष बागकार या स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून कामगिरी बजावणार आहेत आणि दिल्लीचे राष्ट्रीय पंच कुमार अजय व महाराष्ट्राचे राष्ट्रीय पंच सूर्यकांत पाटील हे सहाय्यक पंचांची भूमिका पार पाडतील.

हेही वाचा :  परळच्या मैदानात KHO-KHO चा थरार; मैदानाला रणभूमीचे स्वरूप

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *