मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद Kho-Kho स्पर्धा : मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व विद्यार्थी क्रीडा केंद्राचे वर्चस्व
मुंबई :
मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने परळच्या ऐतिहासिक लाल मैदानावर वेग, चपळाई, डावपेच आणि जीवघेण्या झुंजींचा असा काही महाथरार रंगला की प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला! ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि तुफान गर्दीच्या साक्षीने पार पडलेल्या विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित ६२ व्या मुंबई व्यावसायिक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुंबईच्या खो-खोचा खरा ‘कॅलिबर’ अनुभवायला मिळाला. पुरुष व्यावसायिक गटात मध्य रेल्वे, महिला व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे, तर ४ फूट ११ इंच प्रायोगिक गटात यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राने अजिंक्यपदावर मोहोर उमटवत मैदान गाजवले.

पुरुष अंतिम सामना – मध्य रेल्वेचा अंगावर शहारा आणणारा विजय
पुरुषांच्या अंतिम सामन्यात मध्य रेल्वेने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पश्चिम रेल्वेचा २.४० मिनिटे राखून १३–१२ असा १ गुणाने पराभव करत अजिंक्यपद पटकावले. मध्य रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम संरक्षण स्वीकारले होते. या थरारक सामन्यावर देवेंद्र बर्डे यांनी पंचप्रमुख म्हणून काम पाहिले. मध्य रेल्वेच्या विजयात रामजी कश्यप (२.२०, नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), दिलीप खांडवी (१.१०, २ मि. संरक्षण व १ गुण), मिलिंद चावरेकर (१.२०, १.४० मि. संरक्षण व १ गुण), विजय हजारे (१.१०, १.४० मि. संरक्षण) अर्णव पाटणकर (१.४० मि. संरक्षण व २ गुण) यांनी निर्णायक योगदान दिले. तर पराभूत पश्चिम रेल्वेकडून महेश शिंदे (२.२०, २.१० मि. संरक्षण व २ गुण), ऋषभ वाघ (१.२०, १.५० मि. संरक्षण), निखील सोडये, राहुल मंडल, मझहर जमादार (प्रत्येकी ३ गुण) यांनी दिलेली झुंज अखेर अपुरी ठरली.

महिला Kho-Kho अंतिम सामना – पश्चिम रेल्वेचा ‘राजेशाही’ विजय
महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने आक्रमक खेळाचे दमदार प्रदर्शन करत रचना नोटरी वर्क्सचा ६–४ असा एक डाव राखून २ गुणांनी दणदणीत धुव्वा उडवत पराभव करत अजिंक्यपद पटकावले. पश्चिम रेल्वेने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले. या सामन्याचे प्रमुख पंच कांती सरवैया होते. विजेत्या पश्चिम रेल्वेकडून संध्या सुरवसे (५ व नाबाद ३ मि. संरक्षण व १ गुण), अर्चना मांजी (४ मि. संरक्षण व २ गुण), तेजस्विनी के. आर. (नाबाद २ मि. संरक्षण), दिव्या गायकवाड, किशोरी मोकाशी (प्रत्येकी २ मि. संरक्षण), कल्याणी कंक व सुहानी धोत्रे (प्रत्येकी २ गुण) यांनी शानदार खेळ केला. तर पराभूत रचना नोटरी वर्क्सकडून साक्षी वाफेलकर (१ मि. संरक्षण व ४ गुण), गीतांजली नरसाळे (२.२० मि. संरक्षण), साक्षी तोरणे (१.३० मि. संरक्षण), काजल शेख (१.४० मि. संरक्षण) यांचा लढाऊ खेळ मोठ्या पराभवापासून संघाला वाचवू शकला नाही.
४ फूट ११ इंच गट – यजमान विद्यार्थी क्रीडा केंद्राचा विजयी डंका
४ फूट ११ इंच मुलांच्या प्रायोगिक निमंत्रित अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रीडा केंद्राने ओम साईश्वर सेवा मंडळावर ५–५ (पूर्वार्ध २–२, उत्तरार्ध १–१, जादा डाव २–२) अशी बरोबरी झाल्यानंतर लघुत्तम आक्रमणात ४.४९ मिनिटे राखून थरारक विजय मिळवला. विद्यार्थी क्रीडा केंद्राने नाणेफेक जिंकून संरक्षण निवडले होते. या सामन्याचे प्रमुख पंच अनिल गुरव होते. विद्यार्थी क्रीडा केंद्राकडून विग्नेश जाधव (२.१०, २.५०, ५.०७५ मि. संरक्षण व २ गुण), ओमकार जाधव (नाबाद १, नाबाद ७, नाबाद १.३० मि. संरक्षण व १ गुण), कार्तिक चोडणकर (३.५०, २.४० मि. संरक्षण) यांनी विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर पराभूत ओम साईश्वरकडून सार्थक गामी (३.३०, ४.५० मि. संरक्षण), आरव साटम (३, ५.१०, १.५० मि. संरक्षण), श्लोक जाधव (३ गुण) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली.
दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ विद्यार्थी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष गजानन वाईरकर, कार्याध्यक्ष बाळ नाईक, सचिव पराग आंबेकर, मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष ॲड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव बाळासाहेब तोरसकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थी क्रीडा केंद्र व मुंबई खो-खो संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : Kho-Kho Final : मध्य, पश्चिम रेल्वे, रचना नोटरीची धडक
स्पर्धेतील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार
पुरुष :
▪️ सर्वोत्तम संरक्षक – महेश शिंदे (पश्चिम रेल्वे)
▪️ सर्वोत्तम आक्रमक – अर्णव पाटणकर (मध्य रेल्वे)
▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – रामजी कश्यप (मध्य रेल्वे)
महिला :
▪️ सर्वोत्तम संरक्षक – अर्चना मांजी (पश्चिम रेल्वे)
▪️ सर्वोत्तम आक्रमक – साक्षी वाफेलकर (रचना)
▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – संध्या सुरवसे (पश्चिम रेल्वे)
४ फूट ११ इंच गट :
▪️ सर्वोत्तम संरक्षक – विग्नेश जाधव (विद्यार्थी)
▪️ सर्वोत्तम आक्रमक – श्लोक जाधव (ओम साईश्वर)
▪️ सर्वोत्तम अष्टपैलू – कार्तिक चांदोरकर (विद्यार्थी)



