राष्ट्रीय Kho-Kho स्पर्धा : कुरुक्षेत्रात महाराष्ट्राचा सुवर्णइतिहास
किशोरींचे सलग आठवे विजेतेपद, किशोरांना कांस्य समाधान
हरियाणा :
कुरुक्षेत्र (हरियाणा) येथे सुरू झालेल्या ३५ व्या किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोरी संघाने विजेतेपद पटकावत सलग आठव्या अजिंक्यपदाची ऐतिहासिक नोंद केली. या स्पर्धेत इला पुरस्कार महाराष्ट्रच्या अपर्णा वर्देने, तर भरत पुरस्कार ओडिसाच्या सत्या राजन बेहरने पटकावला. सलग नऊ वेळा अजिंक्यपद जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या किशोर संघाला यंदा मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
किशोरी Kho-Kho अंतिम सामना : राजस्थानवर एकतर्फी विजय, महाराष्ट्राचा दबदबा
हरियाणातील थीम पार्क मैदानावर झालेल्या किशोरी गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने राजस्थानवर एक डाव व १२ गुणांनी (२७–१५) दणदणीत विजय मिळवला. पहिल्याच आक्रमणात महाराष्ट्राने १७ गुणांची (२४–७) निर्णायक आघाडी घेतल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. महाराष्ट्राकडून राही पाटील (२.१० मि. संरक्षण व २ गुण), वेदिका तामखेडे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), अपर्णा वर्दे (२.३५ मि. संरक्षण व २ गुण), ऋतुजा सुरवसे (१.५० मि. संरक्षण), पियुशा परमाळकर (१.४५ मि. संरक्षण) यांनी भक्कम कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. राजस्थानकडून तुलसी (१.४० मि. संरक्षण), गुंजन (१.२० मि. संरक्षण व ४ गुण), राधिका (४ गुण) यांनी प्रतिकार केला; मात्र महाराष्ट्राच्या वेगवान खेळापुढे तो अपुरा ठरला.
किशोर Kho-Kho अंतिम सामना : ओडिसाची कोल्हापूरवर निर्णायक बाजी
किशोर गटाच्या अंतिम सामन्यात ओडिसाने कोल्हापूरचा एक डाव ७ गुणांनी (३१–२४) पराभव करत अजिंक्यपद पटकावले. ओडिसाकडून सत्यरंजन (२, १ मि. संरक्षण व ८ गुण), चिन्मय अम्रिता (१.१०, १.२० मि. संरक्षण व ४ गुण), अमरज्योती (१.१०, १ मि. संरक्षण व २ गुण) यांनी उत्कृष्ट अष्टपैलू खेळ साकारला. कोल्हापूरकडून देवराज येड्राव (६ गुण), गौरव माने (८ गुण) यांनी झुंज दिली; मात्र विजय ओडिसाच्याच पारड्यात गेला.
वैयक्तिक पारितोषिके : गुणवत्तेचा सन्मान
किशोरी गट :
- उत्कृष्ट संरक्षक : राही पाटील (महाराष्ट्र)
- उत्कृष्ट आक्रमक : गुंजन (राजस्थान)
- इला पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : अपर्णा वर्दे (महाराष्ट्र)
किशोर गट :
- उत्कृष्ट संरक्षक : वरद पोळ (महाराष्ट्र)
- उत्कृष्ट आक्रमक : गौरव माने (कोल्हापूर)
- भरत पुरस्कार व अष्टपैलू खेळाडू : सत्या राजन बेहर (ओडिसा)



