Kabaddi : प्रभादेवीत ९ मार्चपासून रंगणार कबड्डी द्वंद्व

मुंबई : 

प्रभादेवी येथील स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित राजाभाऊ देसाई स्मृतीचषक राज्यस्तरीय निमंत्रित स्थानिक पुरुष कबड्डी स्पर्धेला ९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील १८ बलाढ्य संघ आमनेसामने भिडणार असून चढाई-पकडींच्या थरारक लढतींची कबड्डीप्रेमींना मेजवानी मिळणार आहे.

मुंबई कबड्डीची ओळख असलेले स्थानिक मंडळे आणि क्लब यांच्यातील ताकद या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. प्रभादेवीतील चवन्नी गल्ली येथे उभारलेल्या विशेष मॅट मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून राज्यातील विविध जिल्ह्यांतील अव्वल संघ यात सहभागी होत आहेत. मुंबई शहरातील १२ संघांसह उपनगर, पुणे, नाशिक, नांदेड आणि रत्नागिरी येथील संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर्जेदार कबड्डी सामने पाहण्याची संधी मिळणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह व आमदार महेश सावंत यांनी दिली.

प्रो Kabaddi तील नामांकित खेळाडूंची उपस्थिती

या स्पर्धेचे आणखी एक आकर्षण म्हणजे प्रो कबड्डी लीगमध्ये चमकलेले सुमारे ३० खेळाडू विविध संघांच्या वतीने खेळताना दिसणार आहेत. भारतीय रेल्वेचा पंकज मोहिते, शुभम शिंदे, अजिंक्य पवार, मुंबईचा संकेत सावंत, पुणेरी पलटणचा आकाश शिंदे तसेच यू मुंबाचा अजित चव्हाण यांसारखे खेळाडू आपल्या दमदार खेळाने स्पर्धेत रंगत आणणार आहेत.

Kabaddi विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा

स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख पारितोषिकासह चषक प्रदान करण्यात येणार असून उपविजेत्या संघालाही आकर्षक रक्कम देण्यात येईल. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या दोन्ही संघांनाही रोख बक्षिसे देण्यात येणार असल्याचे मंडळाचे क्रीडा प्रमुख संतोष सावंत यांनी सांगितले. याशिवाय सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम चढाईपटू आणि सर्वोत्तम पकडपटू यांनाही विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

स्पर्धेतील गटवाटप

स्पर्धेत सहभागी १८ संघांचे सहा गट करण्यात आले आहेत.

  • अ गट : सतेज संघ बाणेर (पुणे), अमर क्रीडा मंडळ (मुंबई), गोल्फादेवी सेवा मंडळ (मुंबई)
  • ब गट : विजय नवनाथ मंडळ (मुंबई), विजय क्लब (मुंबई), एसएसजी फाउंडेशन (मुंबई)
  • क गट सिद्धीप्रभा फाउंडेशन (मुंबई), ब्रह्मा स्पोर्ट्स क्लब आडगाव (नाशिक), अंकूर स्पोर्ट्स क्लब (मुंबई)
  • ड गट : वाघजाई क्रीडा मंडळ (रत्नागिरी), विजय भारत क्रीडा मंडळ (मुंबई), शिवनेरी सेवा मंडळ (मुंबई)
  • इ गट स्वस्तिक क्रीडा मंडळ (उपनगर), मिडलाईन अकॅडमी (नांदेड), नवोदित संघ (मुंबई)
  • फ गट गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब (मुंबई), भैरवनाथ क्रीडा मंडळ (पुणे), लायन्स स्पोर्ट्स क्लब (मुंबई)

या स्पर्धेमुळे प्रभादेवी परिसरात पुन्हा एकदा कबड्डीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हेही वाचा : MSRTC : यंदाचा अर्थसंकल्प ‘थोडी खुशी थोडा गम’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *