Kabaddi स्पर्धा : जतिन विंदेच्या तूफानाने वाघजाईला रोखले

स्वामी समर्थ कबड्डीत दुसर्‍या दिवशीही थराराची मेजवानी

मुंबई :

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशीही कबड्डीप्रेमी थराराची मेजवानी चाखायला मिळाली. चढाई-पकडींच्या द्वंद्वात वाघजाई-शिवनेरी आणि मिडलाईन-नवोदित यांच्यातील लढती शेवटच्या चढाईत बरोबरीत सुटल्या तर काही लढती गटात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवण्यासाठी फिक्स असल्यासारख्या खेळल्या गेल्या. शिवनेरी सेवा मंडळ १०-२९ असा पिछाडीवर असताना जतिन विंदेने केलेल्या तूफानी चढायांनी वाघजाई क्रीडा मंडळाला नामोहरम करत सामना नाट्यमयरित्या ३९-३९ असा बरोबरीत सोडवला. दुसर्‍या दिवसाच्या संघर्षात वाघजाई, विजय क्लब, गोल्फादेवी या संघांनी विजयाची नोंद करत बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे.

पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसर्‍या दिवसाच्या लढती अधिक रोमहर्षक झाल्या आणि काही लढती कबड्डीची फसवणूक करणार्‍याही झाल्या. रत्नागिरीच्या वाघजाई क्रीडा मंडळाच्या ओमकार कुंभार आणि शुभम शिंदे यांनी केलेल्या सुसाट खेळाने दुसर्‍या दिवसाची जोरदार सुरुवात केली. वाघजाईच्या वेगवान खेळाने पहिल्या दहा मिनीटातच २०-३ अशी आघाडी घेत सामना एकतर्फी केला होता. या आघाडीमुळे वाघजाईने अतिआत्मविशासाचा खेळ केला, ज्याचा शिवनेरीच्या जतिन विंदेने फायदा उठवत वाघजाईच्या संरक्षकांना भेदत सामन्यात पुनरागमन केले. तरीही मध्यंतराला वाघजाईकडे २९-१८ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर जतीनने आणखी सुस्साट खेळ करत पूर्ण सामनाच फिरवला. त्याने मध्यंतरानंतर तब्बल १५ चढाईचे गुण मिळवत वाघजाईची बरोबरीही साधली. सामना वाघजाईच्या हातून निसटतो की काय अशा स्थितीत असताना तो त्यांनी ३९-३९ असा बरोबरीत सोडवला. जतिनने २१ गुण वसूल करीत वाघजाईला चांगलेच हादरवले.

स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी voice of eastern
स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी

नांदेडच्या मिडलाईन अ‍ॅकॅडमी आणि नवोदित संघ यांच्यातील संघर्षही ४०-४० असा बरोबरीत सुटला. नवोदितच्या संतोष ठाकूरच्या चढायांनी मिडलाईनला २१-१७ असे मागे टाकले होते, पण मध्यंतरानंतर धीरज बैलमारेने जोरदार खेळ करत मिडलाइनला विजयाच्या ट्रॅकवर आणले. पण त्यांचा संघ विजयी गुण मिळवण्यात कमी पडला. सामना बरोबरीत सुटल्याने दोघांनाही समान गुण मिळाले.
तिसर्‍या सामन्यात विजय क्लबने मात्र राज नाटेकर, अक्षयकुमार सोनी यांच्या झंझावाती चढायांच्या बळावर विजय नवनाथचे आव्हान ४३-२७ असे सहज परतावून लावले. पहिला सामना बरोबरीत सुटल्याने निराश झालेल्या वाघजाईने आपल्या दुसर्‍या सामन्यात जयभारत संघाचा ४०-१६ असा धुव्वा उडवला. अजिंक्य पवारने चढाईत तर शुभम शिंदे आणि आदित्य शिंदेने पकडीत जोरदार खेळ करत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. त्याचप्रमाणे गोल्फादेवी सेवा मंडळाने अमर क्रीडा मंडळाचा ३२-२७ असा पराभव केला. मध्यंतराला अमरकडे १७-९ अशी आघाडी होती. तेव्हा सनी कोळी, सिद्धेश पिंगळे, विवेक कुमार सरोजच्या आक्रमक खेळाने गोल्फादेवीला विजयश्री मिळवून दिली.

Kabaddi : खरी मॅच की फिक्सींग

गटात पहिले आणि दुसरे स्थान मिळावे म्हणून आज झालेल्या काही लढती थराराविनाच बरोबरीत आणि निकाली लागल्याने प्रेक्षकांनीच मॅच होती की फिक्सिंग असा आरोप लुटूपुटूची लढाई करणार्‍या संघांना केला. स्वस्तिक क्रीडा मंडळ आणि मिडलाईन यांच्यातील सामन्यात मध्यंतराला मिडलाइन ८-७ असा आघाडीवर होता तर मध्यंतरानंतर स्वस्तिकने १७-१८ असा एका गुणाने सामना बहाल केला. या फिक्सिंगसारख्या खेळल्या गेलेल्या लढतीने अस्सल कबड्डीप्रेमींची घोर निराशा झाली. तसेच स्वस्तिकने नवोदित विरुद्धची लढाई १३-१३ अशा बरोबरीत सुटल्यानेही या कबड्डीतला फिक्सिंगने स्पर्धेच्या थरारावर हल्ला चढवला. या एकाच गटातील दोन्ही लढती सपशेल फिक्स झाल्यासारख्याच खेळल्या गेल्या.

हेही वाचा : heatstroke चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *