Kabaddi Tournament : पार्ले स्पोर्ट्स, वाघजाई, एसएसजी, ब्रम्हा उपांत्यपूर्व फेरीत
उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली.
मुंबई :
प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीतील बळीराम सावंत क्रीडानगरीत सुरु असलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी स्पर्धेच्या तिसर्या दिवशी पार्ले स्पोर्ट्स अॅकॅडमी, गोल्फादेवी सेवा मंडळ, एसएसजी फाऊंडेशन, ब्रम्हा स्पोर्ट्स क्लब, वाघजाई क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ यांनी उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान पक्के केले.
बाद फेरी अर्थातच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या अखेरच्या साखळी सामन्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने सिद्धीप्रभा फाऊंडेशनचा ४८-१३ असा धुव्वा उडवत गटविजेतेपद पटकावत थेट उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच गुडमॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने लायन्स स्पोर्ट्स क्लबचा ४५-३२ असा फडशा पाडला. शार्दुल पाटीलने या सामन्यातही जोरदार चढायांचा खेळ सादर करत चक्क २३ गुणांची कमाई केली तर लायन्सकडून राज आचार्यने चांगली लढत दिली. त्याचप्रमाणे ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबने आपल्या दुसर्या सामन्यात अंकूर स्पोर्ट्सला ५२-३२ असे नामोहरम केले. प्रफुल झवरे, आकाश शिंदे यांच्या सुस्साट खेळासमोर अंकूरच्या संरक्षक आणि चढाईबहाद्दरांचे काहीएक चालले नाही. मध्यंतरालाच ३१-१८ अशी विजयी आघाडी घेत ब्रम्हाने अंकूरचा पराभव निश्चित केला होता. अंकूरकडून सुशांत साईलने काहीशी लढत दिली.

उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी स्वस्तिक क्रीडा मंडळाला जयभारतविरुद्ध खेळावे लागले.स्वस्तिकच्या अक्रम शेख, आकाश रुदाले, अशोक विटकर आणि प्रफुल चव्हाण यांच्या चढाई-पकडींच्या भन्नाट खेळाने जयभारतचा निभावच लागू दिला नाही. ३७-२३ अशा फरकाने स्वस्तिकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी पार्ले स्पोर्ट्स अॅकॅडमीशी झुंजावे लागणार आहे. गोल्फादेवी स्पोर्ट्स क्लबने नवोदित संघाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. गोल्फादेवीने धनंजय सरोज, सिद्धेश पिंगळे, सनी कोळी यांच्या आक्रमक खेळामुळे हा सामना सहज जिंकला, नवोदितकडून संतोष ठाकूरने १२ गुण मिळवत एकाकी लढत दिली.
Kabaddi च्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगणार चुरस
आता स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगणार असून पार्ले स्पोर्ट्स विरुद्ध स्वस्तिक, गोल्फादेवी विरुद्ध वाघजाई अशा लढती रंगतील. तसेच अंकूर स्पोर्ट्स क्लब आणि गुडमॉर्निंग यांच्यातील विजेता संघ एसएसजी फाऊंडेशनशी टक्कर देईल. चौथ्या उपांत्यपूर्व लढतीत विजय क्लब आणि इच्छाशक्ती यांच्यातील विजयी संघ ब्रम्हा स्पोर्ट्स क्लबच्या आव्हानाशी मुकाबला करील.



