सब जुनियर carrom competition – ओंकार, वेदिका, शिवांश, निधी जेते
मुंबई
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित व सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट दादर यांच्या सहकार्याने सेंट्रल रेल्वे इन्स्टिटयूट, दादर येथील महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये संपन्न झालेल्या ५९ व्या सब जुनियर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील सब जुनियर गटात अंतिम विजेतेपद पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राष्ट्रीय कॅरमपटू ओंकार वडारने मुंबई उपनगरच्या प्रसन्ना गोळेवार १९-१३, १६-६ असा एकतर्फी विजय मिळवला.

तिसरा क्रमांक प्राप्त करताना मुंबई उपनगरच्या उमेर पठाणने ठाण्याच्या नील म्हात्रेला ११-२१, २१-०, २१-९ असे नमवले. तर १४ वर्षाखालील मुलींच्या अंतिम फेरीत मुंबई उपनगरच्या वेदिका पोमेंडकरने प्रतिस्पर्धी मुंबईच्या गौरी सावंतवर ११-४, १६-४ अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत ठाण्याच्या सारा देवनने धुळयाच्या कल्याणी मराठेवर २१-०, २१-१ असा सहज विनय मिळवला.
१२ वर्षाखालील ( कॅडेट ) मुलांच्या गटात अंतिम सामन्यात ठाण्याच्या शिवांश मोरेने ठाण्याच्या आपल्या सहकारी समर्थ खंडेलवलवार तीन सेटमधील रंगतदार लढतीत २१-५, १-१६ व ९-८ असा उत्कंटावर्ध विजय मिळवून जेतेपद पटकावले. या गटात तिसरा क्रमांक मिळवताना पालघरच्या देवराज कथाडेने पुण्याच्या रुद्र इंगळेवर २१-०, १९-२ असा विजय मिळवला. मुलींच्या १२ वर्षाखालील ( कॅडेट ) गटात राष्ट्रीय कॅरमपटू रत्नागिरीच्या निधी सप्रेने बाजी मारली. तिने ठाण्याच्या देविका जोशींचा २१-१, १९-४ असा सहज धुव्वा उडवत आपल्या अंतिम विजयावर शिक्कामोर्तब केले.
तर तिसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या सिंधुदुर्गच्या दिव्या राणेने पुण्याच्या आरवी शेलारवर ६-१८, १३-७ व १३-११ असा निसटता विजय मिळवला. सर्व विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सरचिटणीस अरुण केदार, खजिनदार अजित सावंत व सहसचिव केतन चिखले यांच्या हस्ते व उपस्थितीत आकर्षक चषक व प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.



