Sion Hospital : शीव रुग्णालयामध्ये रेडिओलॉजी विभागाला आग

मुंबई :

शीव रुग्णालयाच्या मुख्य बाह्यरुग्ण कक्षाच्या शेजारी असलेल्या रेडिओलॉजी विभागातील एसी युनिटमध्ये स्फोट होऊन आग लागली. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांच्या सुमारास घडली. स्फोट झाल्यानंतर रेडिओलॉजी विभागातील रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

शीव रुग्णालय voice of eastern
शीव रुग्णालय

शीव रुग्णालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक सातच्या समाेर असलेल्या मुख्य बाह्यरुग्ण विभागाच्या शेजारच्या इमारतीच्या तळमजल्यावर रेडिओलॉजी विभाग आहे. या विभागातील सर्वात शेवटी असलेल्या एका खोलीतील एसी युनिटमध्ये सकाळी ११ वाजून ५७ मिनिटांनी अचानक स्फोट झाला. या स्फोटानंतर त्या खाेलीमध्ये असलेल्या काही वस्तूंनी पेट घेतली. त्यमुळे त्या खोलीतून मोठ्या प्रमाणात धूराचे लाेट बाहेर पडू लागले. विभागातील कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत रुग्णांना बाहेर काढले, तसेच आग विझविण्यास सुरुवात करत अग्निशमन दलाला पाचारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, बेस्ट कर्मचारी तसेच रुग्णालयातील अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर पोहचून आग नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोणत्याही रुग्णाला किंवा कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नसल्याची माहिती शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी दिली.

हेही वाचा : Mumbai University : कलिना संकुलात ६ इमारतींवर सौर ऊर्जा प्रणाली

या घटनेमुळे रुग्णालयातील काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आपत्कालीन यंत्रणांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकर सुरळीत करण्यात यश आले.

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत