दहावीच्या अतिरिक्त परीक्षेसाठी fees घेणाऱ्या शाळांवर कारवाई
सीबीएसईकडून शाळांना कठोर इशारा
मुंबई –
विद्यार्थ्यांच्या गुण सुधारण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अतिरिक्त परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून काही शाळांकडून शिकवणी शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या शुल्क वसूल करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) देशातील सर्व संलग्न शाळांना दिला आहे. यासंदर्भात परिपत्रक जाहीर करून शुल्क न घेण्याच्या सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना गुण सुधारण्याची संधी मिळावी यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) ‘टू बोर्ड परीक्षा’ धोरण लागू केले आहे. त्यानुसार यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्यासाठी अतिरिक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा मे महिन्यामध्ये होणार आहे. दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ‘लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स’ म्हणजेच विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याच्या सूचना मंडळाने शाळांना दिल्या आहेत. ही प्रक्रिया तीन टप्प्यांत विभागली आहे. पहिल्या टप्प्यातमध्ये केवळ विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारायचे नाही. या टप्प्याचा उद्देश परीक्षेस बसणाऱ्या संभाव्य विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करणे हा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना विषयांमध्ये बदल, समावेश किंवा वगळण्याची संधी देण्यात येणार असून, याच वेळी नियमानुसार परीक्षा शुल्क भरून अंतिम नोंदणी पूर्ण केली जाणार आहे. ही प्रक्रिया संबंधित शाळांमार्फत पार पाडली जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक सीबीएसई मंडळाने १७ मार्च २०२६ रोजी जारी केले आहे. मात्र काही शाळांकडून ही नोंदणी करताना विद्यार्थ्यांकडून तीन महिन्यांचे शिकवणी शुल्क घेतले जात आहे. यासंदर्भातील तक्रारी विद्यार्थी व शिक्षकांकडून मंडळाकडे करण्यात आल्या आहेत. याची दखल घेत मंडळाने हे पूर्णपणे नियमबाह्य असून, शुल्क घेण्याचे प्रकार तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
केवळ अधिकृत परीक्षा fees आकारली जाऊ शकते
विद्यार्थ्यांची यादी सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान केवळ अधिकृत परीक्षा शुल्कच आकारले जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त किंवा अनधिकृत शुल्क आकारण्यास सक्त मनाई आहे. तसेच, परीक्षा शुल्क भरल्यानंतरही एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्या बोर्ड परीक्षेस बसण्याचा निर्णय बदलल्यास, त्याच्या मुख्य परीक्षेतील गुणांवरच निकाल जाहीर केला जाईल, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे. तसेच दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांकडून शुल्क घेणाऱ्या शाळांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही मंडळाने दिला आहे. सीबीएसईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे.


