10th Result : राज्याचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी घसरला

कोकण मंडळाची बाजी;  मुलींचे वर्चस्व कायम

मुंबई : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात कोकण मंडळाने बाजी मारली आहे. राज्याचा निकाल ९२.०९ टक्के लागला असून यंदाही निकालावर मुलींनी वर्चस्व कायम ठेवले आहे. तर सलग दुसऱ्या वर्षी निकालात घसरण झाली आहे.

दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर voice of eastern
दहावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर

राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार २६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९ हजार ५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८ हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यांपैकी २२ हजार ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ आहे. तसेच राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९ हजार ५१८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २८ हजार ८६७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी ९ हजार ७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ३३.७९ आहे.

नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६ लाख १४ हजार ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १६ लाख १६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यांपैकी १४ लाख ५२ हजार २४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.७५ आहे. राज्यभरातून १० हजार ३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९१२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यांपैकी ९ हजार ४२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ आहे.

हेही वाचा :  Rising heat : वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांची वाढली पोटदुखी

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९७.६२ टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा ८८.४१ टक्के लागला आहे. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५६ आहे. त्यामुळे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० ने जास्त आहे. मंडळाने एकूण ६४ विषयांची परीक्षा घेतली होती. त्यापैकी एकूण २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

10th result : निकालाची वैशिष्टये

  • राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ४ लाख २२ हजार ८५१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ४ लाख ८२ हजार २६४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३ लाख ८० हजार ४३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ लाख ३४ हजार ९३४ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
  • राज्यातील २३ हजार ६९८ माध्यमिक शाळांतून १५ लाख ५५ हजार २६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ६१२ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
  • दहावी परीक्षा मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के लागला होता. मार्च २०२४ चा निकाल ९५.८१ टक्के, तर फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ९४.१० टक्के आणि फेब्रु-मार्च २०२६ च्या नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.
  • गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल २.०१ टक्के ने कमी लागला आहे.

विभागीय मंडळनिहाय निकालाची टक्केवारी

पुणे – ९४.२४ टक्के
नागपूर – ८९.०७ टक्के
छत्रपती संभाजीनगर – ८८.४१ टक्के
मुंबई – ९४.९७ टक्के
कोल्हापूर – ९५.४७ टक्के
अमरावती – ९०.५० टक्के
नाशिक – ९०.५३ टक्के
लातूर – ८८.४२ टक्के
कोकण – ९७.६२

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत