Rising heat : वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांची वाढली पोटदुखी
रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत ५० टक्क्यांनी वाढ
मुंबई :
वाढत्या तापमानामुळे मुंबईमध्ये पोटदुखीच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या पचनसंस्थेवर व आतड्यांवर परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दूषित अन्न, निर्जलीकरण यामुळे पोटाच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईतील वाढत्या उष्णतेमुळे पोटाच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषतः ३० ते ४५ वयोगटातील नागरिकांमध्ये उलट्या, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे अन्न लवकर खराब होते. तसेच कापलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने साठवलेल्या फळांमध्ये जीवाणू, बुरशी आणि इतर जंतूंची वाढ वेगाने होते. उघड्यावर असलेल्या कापलेल्या फळांमध्ये साल्मोनेला, ई. कोलाई आणि लिस्टीरिया यांसारखे जंतू वाढतात. त्यामुळे अतिसार, उलट्या आणि निर्जलीकरण यांसारख्या अन्नजन्य आजारांचा धोका वाढतो. हा धोका विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि कमी प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक गंभीर ठरू शकतो. निर्जलीकरणामुळे आतड्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन, संसर्गाचा धोका वाढतो, परिणामी मागील काही दिवसांमध्ये पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
Rising heat : ३० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक
वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता, चुकीच्या सवयी, उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन आणि एसीच्या वापरामुळे पोटाच्या तक्रारी वाढत आहेत. मागील काही दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये साधारणपणे ३० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक आहे. बऱ्याचदा संसर्गामुळे हा त्रास झाला असल्याचे समजून रुग्णांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु उष्णतेमुळे अन्न व पाण्यात वाढलेल्या जीवणुमुळे हा त्रास होत असतो. त्यामुळे शक्यतो ताजे, घरचे अन्न खावे, उघड्यावरचे अन्नपदार्थ, कापलेली फळे किंवा बर्फाचे गोळे खाणे टाळावे. उन्हाळ्यात पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे प्रचंड उन्हातून थेट वातानुकूलित कक्षामध्ये जाणे किंवा त्याउलट थंड वातावरणातून थेट उन्हात जाणे यामुळे शरीरावर ताण येतो. याचा परिणाम पचनक्रिया व प्रतिकारशक्तीवर होतो, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे वरिष्ठ सल्लागार, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. ऋषिकेश मलोकर यांनी सांगितले.

उष्णतेमुळे अन्न आणि पाण्यामध्ये जिवाणूंच्या वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. परिणामी मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये वाढलेल्या तापमानामुळे २५ ते ५५ वयोगटातील नागरिकांमध्ये पोटाच्या संसर्गाच्या (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन्स) आजारामध्ये वाढ झाली आहे. दर महिन्याला १० पैकी ३ रुग्णांमध्ये निर्जलीकरण, पोट फुगणे, जुलाब, ॲसिडीटी, गॅस, उलट्या, मळमळ आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांमधील या संसर्गाचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम जैन यांनी दिली.
काय काळजी घ्याल
ॲसिडिटी किंवा पोटदुखी सारख्या अनेक समस्या आता उष्णतेमुळे वाढलेल्या जिवाणू संसर्ग आणि निर्जलीकरणमुळे होतात. दुपारी १२ ते ४ या कालावधीत शक्यताे बाहेर पडणे टाळा. पुरेसे पाणी प्या, ताजे व घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करा. उघड्यावरील अन्नपदार्थाचे सेवन टाळणे, तसेच रस्त्यावर मिळणारी कापलेल्या फळांचे सेवन करणे टाळल्याने संसर्गाचा धोका कमी करता येऊ शकतो. उष्णतेमुळे फळे लवकर पिकतात आणि खराब होतात. पिकलेल्या फळांमध्ये यीस्ट आणि बॅक्टेरियांची वाढ होते, त्यामुळे फळांचे सेवन केल्यास पोटदुखी, गॅस, किंवा क्वचित प्रसंगी सौम्य नशेसारखी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे जास्त पिकलेली फळे खाणे टाळावे.



