Google training : राज्यातील चार लाख शिक्षकांना प्रशिक्षण
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे प्रगत प्रशिक्षण मिळणार
मुंबई :
तंत्रज्ञानस्नेही विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनाही तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाकडून गुगलच्या सोबतीने हे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ हा प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांमध्ये राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना सुद्धा तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे शिक्षकांना तंत्रज्ञान प्रशिक्षित करण्यासाठी शिक्षण विभागाने गुगलच्या मदतीने ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही निवडक तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित झालेले शिक्षक राज्यभरातील अन्य शिक्षकांना प्रशिक्षण देतील. या पद्धतीने राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षकांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी राज्य सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. राज्यातील सर्व शिक्षकांचे संपूर्ण प्रशिक्षण गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेची काळजी घेण्यात येणार असून, या संपूर्ण प्रक्रियेवर राज्य सरकारचे नियंत्रण राहणार असल्याचेही शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
२१ व्या शतकात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शासकीय, अनुदानित शाळा यामधील शिक्षकांना जागतिक दर्जाची संस्था असलेल्या गुगलकडून प्रशिक्षण मिळावे. यासाठी शिक्षण विभाग आणि गुगल यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सहकार्याअंतर्गत शिक्षकांमध्ये डिजिटल कौशल्ये विकसित करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता वाढविणे, शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख प्रदान करणे, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये स्थानिकीकरण केलेली प्रशिक्षण सामग्री उपलब्ध करून देणे, तसेच आधुनिक गुगल एआय साधनांचा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला चालना देण्यात येणार आहे.
Google training : तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धतींचा प्रसार
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धतींचा प्रसार होण्यास मदत होणार आहे. तसेच कनेक्टेड वर्गखोल्या, आयसीटी प्रयोगशाळा, डिजिटल ग्रंथालये, भाषा प्रयोगशाळा आणि स्मार्ट वर्गखोल्या यांसारख्या डिजिटल शिक्षण सुविधांना बळकटी मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव ताशीलदार, गुगल फॉर एज्युकेशनचे वरिष्ठ अधिकारी संजय जैन, विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.



