Tukaram mundhe : गिरगावमध्ये भेसळयुक्त मिठाई व मावा जप्त
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई
मुंबई :
निकृष्ट दर्जाच्या आणि असुरक्षित अन्न पदार्थांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत गिरगावमध्ये दोन ठिकाणी छापे घालून एफडीएने तब्बल ३ लाख ६० हजार रुपये किमतीची मिठाई व मावा जप्त केला. यामुळे गिरगावमधील मिठाई विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गिरगावमधील कुंभारवाडा पहिल्या लेनमधील दुर्गादेवी उद्यानाजवळील मेसर्स डीएम मावावाला आणि गोल देऊळजवळील विजय यादव यांच्या आस्थापनावर अन्न व औषध प्रशासनाने छापा मारला. या छापामध्ये अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत साठवलेला आणि निकृष्ट दर्जाचा असल्याचा संशय असलेला १ हजार ३२८ किलोपेक्षा जास्त मिठाई आणि माव्याचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या मिठाई व दाव्याची किंमत ३ लाख ६० हजार ३८० रुपये इतकी आहे. या कारवाईमध्ये खाद्यपदार्थांच्या लेबलवर गंभीर त्रुटी आणि आवश्यक नियामक घोषणांचा अभाव असल्याचे आढळून आला. साठवणुकीची जागा अत्यंत अस्वच्छ आणि आरोग्याला घातक असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अन्न दूषित होण्याचा मोठा धोका होता, नाशवंत दुग्धजन्य पदार्थांसाठी आवश्यक असलेले आणि निर्धारित साठवणूक तापमान राखण्यात आले नव्हते. जप्त केलेला साठा निकृष्ट दर्जाचा आणि सार्वजनिक आरोग्यास हानीकारक असण्याचा संशय असल्याने एफडीएकडून मिठाई व मावा जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिमंडळ १ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) तथा पदनियुक्त अधिकारी अनुपमा पाटील व सह-आयुक्त (अन्न) एम. एन. चौधरी यांच्या देखरेखीखाली अन्न सुरक्षा अधिकारी तेजस्विनी पाटील, सिद्धेश्वर आगजल, आकाश चव्हाण आणि जयकुमार पाटील यांनी कारवाई करण्यात आली.
Tukaram mundhe : टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा
अन्नपदार्थांची गुणवत्ता किंवा खाद्यपदार्थ विक्री, निर्मिती करणाऱ्या आस्थापनांबाबत काही तक्रार असल्यास, नागरिकांनी १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासना द्वारे करण्यात आले आहे. तसेच, मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांनी सर्व अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्या मधील विनियमा अंतर्गत येणारे संबंधित नियम व तरतुदींचे विशेषतः उत्पादन, लेबलिंग, घटक पदार्थांची घोषणा आणि जाहिरात याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Tukaram mundhe : राज्यात २९ आस्थापनांवर कारवाई
अन्न व औषध प्रशासनामार्फत मुंबईसह कोकण, पुणे, नाशिक, नागपूर व अमरावती या विभागात संशयित कमी दर्जा किंवा असुरक्षित अन्नपदार्थ तसेच अस्वच्छ उत्पादन प्रक्रिया आणि लेबल दोष, मिथ्या छाप व भ्रामक जाहिरात केल्याकारणाने २९ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये बेकरी पदार्थ, सुपारी, खाद्यतेल, दुध व दूग्धजन्य पदार्थ, खवा,पेढा, तूप, गूळ इत्यादी अन्न पदार्थ तसेच भेसळ करण्यासाठी वापरले जाणारे पदार्थांचा सुमारे ३८ लाख ४२ हजार ९०७ रुपये किमतीचा ६८०२९.६५ किलो इतका साठा जप्त करण्यात आला.



