UGC-NET exam आजपासून ३० जूनपर्यंत
मुंबई :
उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात प्रवेशासाठी महत्त्वाची मानली जाणारी यूजीसी-नेट जून २०२६ परीक्षा रविवार, २२ जूनपासून सुरू होत आहे. देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ३० जूनपर्यंत ही परीक्षा पार पडणार असून एकूण ८५ विषयांसाठी संगणकाधारित पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) यांच्याकडून परीक्षेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून संबंधित उमेदवारांची प्रवेशपत्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यंदा यूजीसी-नेट परीक्षा २२, २३, २४, २५, २९ आणि ३० जून या सहा दिवसांत होणार आहे. प्रत्येक दिवशी दोन सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येणार असून सकाळ आणि दुपारच्या सत्रांत विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विषयांच्या संख्येनुसार दररोज सरासरी १२ ते १६ विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी, २२ जून रोजी अर्थशास्त्र, संगणक विज्ञान, हिंदी, मराठी, संगीत, लोकसंख्या अध्ययन, कामगार कल्याण आणि मानव संसाधन व्यवस्थापन यांसारख्या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. त्यानंतर २३ जून रोजी शिक्षणशास्त्र, सामाजिक कार्य, सार्वजनिक प्रशासन, विधी, जनसंज्ञापन व पत्रकारिता, इलेक्ट्रॉनिक विज्ञान, महिला अध्ययन, तत्त्वज्ञान आदी विषयांचा समावेश आहे.
२४ जून रोजी राज्यशास्त्र, वाणिज्य, भारतीय संस्कृती, संरक्षण व सामरिक अध्ययन, जैन, बौद्ध व गांधी अध्ययन, भाषाशास्त्र यांसारख्या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. २५ जून रोजी इंग्रजी, इतिहास, पाली, प्राकृत, तुलनात्मक साहित्य, स्पॅनिश, काश्मिरी आणि कोकणी विषयांचा समावेश आहे.
हेही वाचा : Traffic block : लोकमान्य टिळक टर्मिनसवर ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक
२९ जून रोजी मानसशास्त्र, व्यवस्थापन, अरबी, मैथिली, कन्नड, शारीरिक शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आयुर्वेद जीवशास्त्र तसेच संस्कृत पारंपरिक विषयांच्या परीक्षा होणार आहेत. अखेरच्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी मानवाधिकार व कर्तव्ये, सांख्यिकी, वनीकरण, समाजवैद्यक व सामुदायिक आरोग्य, पर्यटन प्रशासन, पुरातत्त्वशास्त्र, गुजराती, संस्कृत, ओडिया आणि आंतरराष्ट्रीय अध्ययन यांसह विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
UGC-NET : प्रवेशपत्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध
राष्ट्रीय परीक्षा संस्थेने उमेदवारांना परीक्षा शहर आणि तारखेची माहिती यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. तसेच सर्व परीक्षार्थ्यांची प्रवेशपत्रे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करताना अथवा अन्य कोणतीही अडचण आल्यास एनटीएच्या मदत केंद्राशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे.



