मुंबईतील शालिमारसह तीन हॉटेलवर FDA तुकाराम मुंढेची कारवाई

गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड

मुंबई :

नागरिकांना सकस व भेसळमुक्त अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. त्यानुसार मुंबईमध्ये भेंडीबाजारमधील शालिमार हॉटेल, नूर मोहम्मदी हॉटेल आणि उमरखाडीतील रहमानिया रेस्टॉरंटच्या केलेल्या तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या तिन्ही नामांकित हॉटेलचे एफडीएकडून परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

शालिमारसह तीन हॉटेलवर कारवाई voice of eastern
शालिमारसह तीन हॉटेलवर कारवाई

मुंबईतील भेंडीबाजार येथील नामांकित हॉटेल असलेल्या मे. शालिमार हॉस्पिटॅलिटी प्रा. लिमिटेडची एफडीएने १६ एप्रिल रोजी तपासणी केली होती. या तपासणीमध्ये काही गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे हॉटेल मालकाला २८ एप्रिल रोजी सुधारणा नोटीस देण्यात आली. त्यानंतर १३ जुलै रोजी केलेल्या पुनर्तपासणीत २५ गंभीर त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये स्वयंपाकघरातील ओले व घसरडे मजले, कच्च्या मालाची नोंद नसणे, पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचा अभाव, खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी नसणे, शाकाहारी व मांसाहारी अन्नाची योग्य विलगीकरण व्यवस्था नसणे तसेच कीटकप्रतिबंधक जाळीविना उघड्या खिडक्या अशा गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या हॉटेलचा परवाना १४ जुलै रोजी निलंबित करण्यात आला.

Fda action भेंडीबाजारमध्ये कारवाई

भेंडीबाजार अन्या एक नामांकित नूर मोहम्मदी हॉटेलची १३ जुलै रोजी तपासणी केली. या तपासणीमध्ये स्वयंपाकघरातील मजल्यांवर काळ्या तेलाचे जाड थर, कबाब विभागाजवळ उघड्या खिडक्यांमुळे माशा, कीटक व कावळ्यांचा मुक्त प्रवेश, भिंती व छतांवर निघालेला रंग व तेलाचे थर, कच्च्या मालाची अस्वच्छ साठवण, पुरवठादारांच्या नोंदींचा अभाव, जुनी व अस्वच्छ भांडी वापरणे, पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या नोंदी नसणे तसेच कीटक नियंत्रणासाठी आवश्यक ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे आढळून आले. त्यामुळे १४ जुलै रोजी या हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

रहमानिया रेस्टॉरंटवरही FDA ची कारवाई

उमरखाडी येथील मे. रहमानिया रेस्टॉरंटची सुद्धा १३ जुलै रोजी तपासणी केली. या तपासणीमध्ये अन्नपदार्थ, रसायने व पॅकेजिंग साहित्याच्या साठवणुकीसाठी अपुरी व्यवस्था, कीटकप्रतिबंधक नसलेले दरवाजे, गंजणाऱ्या व निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनविलेली उपकरणे, भिंती व छतांवरील निघालेला रंग व प्लास्टर, अन्नपदार्थांच्या आवश्यक चाचण्यांच्या नोंदींचा अभाव तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचण्या न केल्याचे आढळून आले. त्यामुळे या हॉटेलच्या तपासणीनंतर त्याच दिवशी परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा

ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खाद्य व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : FDA action: राज्यात लाखोंचे निकृष्ट दुग्धजन्य पदार्थ जप्त

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत