FDA action: राज्यात लाखोंचे निकृष्ट दुग्धजन्य पदार्थ जप्त

मुंबई :

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरामध्ये दुध भेसळीविरोधात हाती घेतलेल्या माेहीमेंतर्गत ९ जुलै रोजी राज्यात पाच ठिकाणी छापे मारले. या छाप्यामध्ये तब्बल २ हजार २७२ किलो ग्रॅम दूध व दुग्धजन्य पदार्थाचा १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यातील ५८ हॉटेलांवर केलेल्या कारवाईमध्ये २६ हॉटेलांना सुधारणा नोटीस देऊन चार हॉटेलांचे परवाने रद्द करण्यात आले.

मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील एस.एन.डी.टी. महाविद्यालयाजवळील मे. गौतम दुग्धालय येथे एफडीएने कारवाई करून १६० किलाग्रॅम बासुंदी, २१० लिटर दूध, १६० किलोग्रॅम आईस्क्रीम असा ५३० किलोग्रॅमचा ७९ हजार १२० रुपयांचा साठा जप्त केला. तीन नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. लेबलिंग नियमांचे उल्लंघन, अस्वच्छ साठवणूक व आवश्यक शीतसाखळी न राखल्यामुळे संबंधित आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला. त्याचप्रमाणे अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील सिद्धेश्वर मिल्क प्रॉडक्ट्सवर टाकलेल्या छाप्यामध्ये ४ हजार ४८४ किमतीचे ११८ लिटर आणि शिवामृत मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये ४८ हजार २१६ रुपये किमतीचे १ हजार १४८ लिटर गायीचे दूध निकृष्ट असल्याच्या संशयावरून, तसेच अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक केल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आले. जळगावमधील हेमराज डेअरी फार्मा येथे १४ हजार २८० रुपयांचे २३८ लिटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय, तसेच अस्वच्छ परिस्थितीत साठवणूक केल्याचे आढळून आल्याने जप्त करण्यात आले. तसेच लातूरमध्ये भेसळयुक्त दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये १६ हजार ४२२ रुपये किमतीचे २३८ लिटर दूध नष्ट करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनामार्फत दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहिम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

FDA Action : वाशीतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये छापा

नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमधील मे. श्री आशापुरा एंटरप्रायझेसवर ९ जुलै रोजी केलेल्या कारवाईमध्ये ९ हजार ६३० किलोग्रॅम राजगिरा, पिवळी मोहरी, मोहरी, अळशी व सब्जा बियांचा सुमारे ९ लाख ७६ हजार १६४ रुपये किमतीचा साठा भ्रामक लेबलिंग व निकृष्ट दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला.

राज्यातील चार हॉटेलचे FDA कडून परवाने रद्द

धुळे येथील जय मसजिसा राजस्थान स्वीट, रुद्रा बेकरी हे दुकान विना परवाना चालविण्यात येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच पुण्यातील वेंकटेश पुरम आणि इराणी टी कॅफेमध्ये स्वच्छता व आरोग्यविषयक तरतुदींचे उल्लंघन केल्याने अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला.

हेही वाचा : Tukaram mundhe : राज्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने जप्त

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत