Mother India : भारतमाताच्या अंगणात भारतमातेचा जयजयकार!

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष; विनर्स संस्थेकडून भारतमाता गीताचे दिमाखात अनावरण

मुंबई :

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याच ठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः भारावून गेले.

भारतमाता गीताचे अनावरण voice of eastern
भारतमाता गीताचे अनावरण

मुंबईसह पुणे, रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून आलेल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. भारतमातेला सलाम करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि भारतमातेविषयीची आस्था जागवण्याचा संदेश देण्यात आला.

भारत माता आणि गोमातेला साकडे घालणारे हे देशभक्तिपर गीत आता राज्यातील विविध सिनेमागृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे रुपेरी पडद्यावर चित्रपट सुरू होण्यापूर्वीच प्रेक्षकांना भारतमातेच्या जयघोषातून देशभक्तीची अनुभूती घेता येणार आहे, अशी माहिती विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ज्योती शशिकांत खामकर यांनी दिली.

या अनावरण सोहळ्याला पोलीस अधीक्षक भालेकर मॅडम, विनर्स लाईफ ट्रेनिंगचे सर्वेसर्वा शशिकांत खामकर तसेच विश्वस्त गजेंद्र जुईकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mother India : सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने सुरू

विनर्स लाईफ ट्रेनिंग आणि विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ‘जॉय ऑफ गिव्हिंग’ या उपक्रमाच्या माध्यमातून वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आदिवासी पाडे तसेच विविध गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जात आहे. या उपक्रमातून आतापर्यंत हजारो गरजूंना मदत आणि आधार देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता अन्नदानासाठी आवश्यक वस्तूंचे दान, गरजूंना जीवनावश्यक साहित्याची मदत आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याचे काम संस्थेकडून सातत्याने केले जात आहे.

सामाजिक कार्याची हीच भावना आणि राष्ट्रप्रेमाची हीच ज्योत आता ‘भारत माता गीताच्या’ माध्यमातून अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे. सिनेमागृहांच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत हे गीत पोहोचणार असल्याने मनोरंजन सुरू होण्यापूर्वीच भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा संदेश प्रत्येकाच्या मनात पोहोचेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

हेही वाचा : Law Admission: विधिच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत