Gadchiroli : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला ग्राउंड झिरोवरून आढावा
मुंबई :
गडचिरोलीतील विविध रस्ते-पूल, खनिज वाहतूक मार्गिका, आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक अंतर्गत प्रकल्प, पूर्ण झालेली विकासकामे आणि अतिवृष्टीमुळे बाधित रस्ते-पुलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. दिवस-रात्र विकास कामांची पाहणी करत, अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत, रस्ते आणि पुलांच्या प्रगतीची बारकाईने तपासणी करत, मंत्री यांनी रात्री उशिरापर्यंत प्रत्येक कामाची सद्यस्थिती जाणून घेतली.

या दौऱ्यादरम्यान कोठी-कोरणार पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. कारण विकासकामे केवळ पूर्ण होणे नाही, तर ती दर्जेदार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांना थारा नाही, गुणवत्तेत तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा मंत्री महोदयांनी दिला.
Gadchiroli : प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत
गडचिरोलीतील छोटे-मोठे पूल, नाले आणि ओढ्यांवरील पुलांसाठी स्वतंत्र पूल पॅकेजची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येईल असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी सांगितले आहे. यासोबतच, चामोर्शी–हरणघाट रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी, कोनसरी येथील औद्योगिक प्रकल्पाला भेट आणि गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली. या सर्व प्रकल्पांची कामे नियोजित वेळेत आणि तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
प्रत्यक्ष पाहणी करून कृतीवर भर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोलीच्या विकासासाठी वेग, गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा निर्धार हाच आमचा संकल्प असल्याचे प्रतिपादन मंत्री महोदयांनी यावेळी केले आहे.



