Medical Admission : वैद्यकीय व दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
अर्ज नोंदणी १२ ऑगस्टपर्यंत तर पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला होणार जाहीर
मुंबई :
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया जाहीर केल्यानंतर आता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षानेही (सीईटी कक्ष) राज्य कोट्याच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्जनोंदणी करता येणार आहे. तसेच पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

राज्यातील शासकीय, अनुदानित, महानगरपालिका, खासगी विनाअनुदानित तसेच शासनाने अधिसूचित केलेल्या वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयांमधील राज्य कोट्यातील प्रवेश नीट (यूजी) २०२६ मधील गुणवत्तेनुसार दिले जातात. राज्य कोट्याअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय कोट्यासाठी नोंदणी केली असली तरी त्यांना राज्य कोट्यासाठी सीईटी कक्षाकडे स्वतंत्र अर्ज नोंदणी करणे आवश्यक असते. त्यामुळे राज्य कोट्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अर्जासोबत आवश्यक मूळ कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती १३ ऑगस्टपर्यंत अपलोड करायच्या आहेत. अपलोड केलेल्या कागदपत्रांची ऑनलाइन अथवा छाननी केंद्रामार्फत ७ ते १४ ऑगस्टपर्यंत पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीवर विद्यार्थ्यांना आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी १६ व १७ ऑगस्ट या कालावधीत संधी देण्यात आली आहे. जागांचा तपशील आणि अंतिम गुणवत्ता यादी १८ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना १९ ते २२ या कालावधीमध्ये ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविण्यासाठी मुदत देण्यात येणार आहे.
पहिली फेरी २३ ऑगस्टला जाहीर होणार असून, या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी २४ ते २८ ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व अद्ययावत सूचना आणि अधिसूचना अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर उपलब्ध असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Medical Admission : आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्रे वेळेत सादर करा
आरक्षण प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र तयार ठेवावे, तसेच इडब्ल्यूएस प्रवर्गांतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी वैध असलेले इडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनी वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग पात्रता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे सीईटी कक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, निर्धारित कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो. तसेच एनआरआय विद्यार्थ्याने त्याच्या पात्रतेच्या पडताळणीसाठी ११ ऑगस्ट पूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. एनआरआय विद्यार्थी गुणवत्तेनुसार केवळ १५ टक्के संस्थात्मक कोट्यासाठी पात्र आहेत.
Medical and Dental Admission वेळापत्रक
ऑनलाइन अर्जनोंदणी – ६ ते १२ ऑगस्ट
कागदपत्रांची रंगीत स्कॅन प्रत अपलोड व शुल्क भरणा – ६ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट
कागदपत्र पडताळणी – ७ ते १४ ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी – १५ ऑगस्ट
हरकती नोंदविणे – १६ व १७ ऑगस्ट
अंतिम गुणवत्ता यादी व जागा तपशील – १८ ऑगस्ट
ऑनलाईन पसंतीक्रम नोंदवणे – १९ ते २२ ऑगस्ट
पहिली कॅप फेरीचा निकाल – २३ ऑगस्ट
महाविद्यालयात प्रवेश निश्चिती – २४ ते २८ ऑगस्ट



