Mumbai University : प्रवेश प्रक्रियेस १२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

प्रवेशासाठी ही अंतिम मुदत असण्याचे विद्यापीठाकडून जाहीर

मुंबई :

मुंबई विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस आणखी एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमध्ये १२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी व प्रवेश घेता येणार आहे.

सीईटी परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने अनेक विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच ग्रामीण भागामध्ये होत असलेला जोरदार पावसामुळे या विद्यार्थ्यांना वेळेवर प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये येत असलेल्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. या विद्यार्थ्यांकडून वारंवार महाविद्यालयांकडे प्रवेशाबाबत विचारणा करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने तीन ते चार वेळा प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे शक्य झाले आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने मुंबई विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, सर्व संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार ही प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत राबविण्यास मुदत दिली आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी काटेकाेरपणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाने दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्याची ही अखेरची संधी असणार आहे.

Mumbai University : प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे बंधनकारक

विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muugadmission.samarth.edu.in आणि पदव्युत्तर व चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी https://muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची इच्छा असेल, त्या संबधित महाविद्यालयांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे. ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे.

पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिल्यानंतर महाविद्यालयातील जागा रिक्त राहिल्यास त्यांनी आपल्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करावी. तसेच या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.

हेही वाचा :  Mard Strike : निवासी डॉक्टरांचे बेमुदत आंदोलन कायम

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत