B.Pharm. admission : २०२५-२६ पूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
सुधारित अभ्यासक्रमाच्या धर्तीवर बी.फार्मचे शिक्षण जुन्या अभ्यासक्रमानुसारच पूर्ण करता येणार
मुंबई :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार भारतीय औषधनिर्माण परिषदेने (पीसीआय) बी.फार्मचा तयार केलेला नवीन अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून लागू करण्यात येत आहे. मात्र २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण जुन्या अभ्यासक्रमानुसारच पूर्ण करता येणार आहे. तसेच बॅकलॉग विषय शिल्लक असले तरी त्यांना पुढील सत्रामध्ये प्रवेश घेण्याची आणि उपस्थित राहण्याची मुभा पीसीआयने दिली आहे. या निर्णयामुळे २०२५-२६ पर्यंत बी.फार्म अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
पीसीआयने एनईपीच्या धाेरणांनुसार नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, कौशल्यविकास, मशीन लर्निंग, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर यावर भर देण्यात आला आहे. तसेच हा अभ्यासक्रम ‘निवड-आधारित श्रेयांक प्रणाली’वर आधारित आहे. नवीन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना औषध संशोधन, औषधनिर्मिती, फार्माकोकायनेटिक्स आणि फार्मसी प्रॅक्टिसमध्ये त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांना शिकविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाची अमलबजावणी २०२६-२७ पासून लागू करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी म्हणजे २०२५-२६ मध्ये किंवा त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना २०२१६-१७ अंतर्गत असलेला अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी पीसीआयने या विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद जाहीर केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून २०१६-१७ या जुन्या बी.फार्म अभ्यासक्रमाअंतर्गत प्रवेश दिले जाणार नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची कोणत्याही सत्रात अपुरी उपस्थिती असेल, त्यांना उपस्थिती पूर्ण करण्याची संधी दिली जाणार आहे. ही संधी विशेष वर्ग, नियमित वर्गांच्या वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त अध्यापन तास, अभ्यासासाठीच्या रजेचा कालावधी किंवा संस्थेने मंजूर केलेल्या इतर व्यवस्थांद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच २०२५-२६ किंवा त्यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग विषय शिल्लक असले तरी त्यांना पुढील सत्रात जाण्याची आणि वर्गांना उपस्थिती राहण्याची मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या सत्राच्या पुढील सत्राचा अभ्यास सुरू ठेवण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे बॅकलॉगचे विषय कायम ठेऊन ते आठव्या सत्रापर्यंत आपला अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात.
B.Pharm. : विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तरतूद
बी. फार्मच्या २०१६-१७ या जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा, यासाठी त्यांच्या उपस्थितीची किमान आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि प्रवेशावेळी लागू असलेल्या नियमांनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मदत करण्यासाठी ही विशेष तरतूदी जाहीर केली असल्याचे पीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा अभ्सक्रम पूर्ण झाल्याची खात्री करण्याची जबाबदारी पीसीआयने महाविद्यालये व विद्यापीठांवर सोपवली आहे.


