Employment in Israel : निवडलेल्या उमेदवारांना इस्त्रायली मानकांनुसार निवासी प्रशिक्षण
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचा पुढाकार; पहिल्या टप्प्यातील १०६ उमेदवारांना औंध, पुणे येथे २७ ते ३१ जुलैदरम्यान प्रशिक्षण
मुंबई :
राज्यातील युवकांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांतर्गत इस्त्रायलमध्ये रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांना तेथील कामकाजाच्या पद्धती, गुणवत्ता निकष आणि व्यावसायिक अपेक्षांशी सुसंगत बनविण्यासाठी इस्त्रायली मानकांनुसार (Israeli Standards) निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्णयानुसार, इस्त्रायलमधील प्लेसमेंटसाठी निवड झालेल्या पहिल्या गटातील १०६ उमेदवारांना २७ जुलै २०२६ ते दि. ३१ जुलै २०२६ या कालावधीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औंध, पुणे येथे पाच दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये इस्त्रायलमध्ये सेवा क्षेत्रातील रोजगारासाठी निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांना संबंधित व्यवसायातील इस्त्रायली मानके, कामाच्या ठिकाणी पाळावयाची सुरक्षितता व गुणवत्ता मानके, आधुनिक बांधकाम पद्धती, व्यावसायिक शिस्त, कार्यसंस्कृती तसेच परदेशातील कामकाजासाठी आवश्यक कौशल्यांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
Employment : आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार
या प्रशिक्षणामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, इस्त्रायलमधील नियोक्त्यांच्या अपेक्षांनुसार काम करण्यासाठी त्यांची तयारी अधिक सक्षम होईल. परदेशातील कार्यसंस्कृतीशी जलद जुळवून घेणे, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण कामकाज करणे, रोजगार टिकवून ठेवण्याची क्षमता वाढविणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्ये आत्मसात करून अधिक चांगल्या करिअरच्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.या संदर्भातील शासन आदेश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत निर्गमित करण्यात आला असून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in वर उपलब्ध आहे.
हेही वाचा : Narayana Health Hospital : सात वर्षे घशात अडकले पेनचे झाकण
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताला जागतिक दर्जाच्या कौशल्यसंपन्न मनुष्यबळाचे केंद्र बनविण्याचा राज्य शासनाचा दृढ संकल्प आहे. भारतीय युवकांचे कौशल्य, गुणवत्ता आणि क्षमता यांना जागतिक व्यासपीठ मिळवून देत, भारताला जगातील सर्वाधिक विश्वासार्ह स्किल टॅलेंट हब म्हणून घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– मंगल प्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग



