FDA Action : MCAच्या क्लबसह नऊ उपहारगृहांचे परवाने रद्द
मुंबई :
अन्न व औषध प्रशासनामार्फत हॉटेल, उपहारगृहांमार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहीमेंतर्गत मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (एमसीए) बीकेसी येथील क्लबमधील पाच उपहारगृहांबरोबरच मुंबईतील नऊ क्लबमधील उपहारगृहांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमीट रूम, पॅव्हेलियन, मेडिटेरेनियन, ओरिएंटल स्विंग आणि क्लबवे आणि पेस्ट्री काउंटर या पाच उपहारगृहांची एफडीएकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. या पाचही उपहारगृहांमध्ये स्वयंपाकघरातील रेफ्रिजरेटरमध्ये साचलेला बर्फ, फरशी घसरडी व अस्वच्छ, खाद्यतेलाच्या रंग, वास व इतर घटकांच्या आधारे करण्यात येणारी नियमित तपासणी न करणे, खराब अवस्थेतील कृषीजन्य कच्चा माल, एफएसएसएआय परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित न करणे, कोल्ड स्टोरेज रूममध्ये खाद्यपदार्थांची योग्य प्रकारे विभागणी न करणे, अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याबाबत आवश्यक फूड ग्रेड प्रमाणपत्र उपलब्ध नसणे, कच्च्या मालाची योग्य तपासणी न करणे, खाद्य आस्थापनेतील उपकरणे व परिसराच्या स्वच्छता व सॅनिटेशनबाबत आवश्यक निकषांचे पूर्ण पालन न करणे, गरम, थंड व गोठविलेल्या खाद्यपदार्थांच्या तापमान नियंत्रणाबाबत आवश्यक दक्षता न घेणे, स्वयंपाकघरातील एका भागाच्या छतावरील प्लास्टर निघालेल्या अवस्थेत आढळले, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याने आवश्यक हातमोजे परिधान केले नसल्याचे आढळले. त्यामुळे या पाचही उपहारगृहांचे परवाने रद्द करण्यात आले. एमसीए क्लबवे आणि पेस्ट्री काउंटरच्या तपासणीमध्ये ‘शिर्के इन्फ्रास्ट्रक्चर’ या आस्थापनेच्या नावावर कोणताही वैध अन्न व्यवसाय परवाना नसतानाही त्यांच्याकडून खाद्य सेवा / अल्पोपहार व चहा विक्री केली जात असल्याचे आढळून आले.
FDA Action : माहीममधील रेस्टॉरंटवर कारवाई
माहीम येथीललेनेक्सिस फूडवर्क्स प्रा. लिमिटेडमध्ये अस्वच्छता, अपुरी वायुवीजन व्यवस्था, साचलेले पाणी व अन्नसुरक्षा निकषांचे उल्लंघन आढळून आल्याने एफडीएकडून परवाना रद्द करण्यात आला. शिवाजी पार्क येथील कॅडेल कॅफेमध्ये अपुरी वायुवीजन व्यवस्था, कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी उपाययोजना नसणे, खाद्य उपकरणे व कंटेनर सहज स्वच्छ करता येतील अशा साहित्याचे नसणे, अन्नपदार्थांची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमार्फत तपासणी केल्याच्या नोंदी नसणे, कर्मचाऱ्यांसाठी अपुरी हात धुण्याची सुविधा व स्वच्छतागृहे, उपकरणांचे योग्य निर्जंतुकीकरण न करणे अशा त्रुटी आढळल्याने परवाना रद्द करण्यात आला.
FDA Action : चायना टाऊन फास्ट फूड कारवाई
मुलुंड चायना टाऊन फास्ट फूड केंद्राच्या तपासणीत खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग तसेच मोनोसोडियम ग्लूटामेटचा अनियंत्रित व अतिरेकी वापर, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे खाद्यतेल वारंवार वापरल्यामुळे काळवंडलेले व अत्याधिक ऑक्सिडाइज्ड झालेले आढळले, झुरळे व किड्यांचा प्रादुर्भाव, गंजलेली व अस्वच्छ उपकरणे, जलनिस्सारणाची अपुरी व्यवस्था आढळल्याने परवाना रद्द करण्यात आला. कुर्ला येथील संकल्प महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित यांच्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या उपहारगृहच्या तपासणीत अन्न तयार करण्याचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी स्थितीत नसणे, भिंती, छत व इतर संरचनात्मक भागांवर डाग, घाण, ग्रीस असणे, आवश्यक कीटक-प्रतिबंध व्यवस्था समाधानकारक नसणे, उपकरणे, भांडी व कंटेनर अस्वच्छ, खराब व काही ठिकाणी गंजलेल्या अवस्थेत आढळले. खाद्यपदार्थ व कच्चा माल पूर्णपणे स्वच्छ व व्यवस्थित पद्धतीने साठविलेला नसल्याचे आढळले.



