Tukaram mundhe : राज्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्य प्रसाधने जप्त

एफडीएची धडक कारवाई

मुंबई :

सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधे व सुरक्षित महाराष्ट्र या मोहीमेंतर्गत राज्यभरात बेकायदेशीररित्या औषधे व सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत ९ जुलै रोजी आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नांदेड येथे केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानमध्ये निर्माण केलेला सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या सौंदर्य प्रसाधनाची कोणतीही देयके संबंधित विक्रेत्याकडे आढळून आले नाहीत. या विक्रेत्याकडून तब्बल ३९ लाख ७० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम १९४५ अंतर्गत एफडीएने राज्यातील विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये छाप्यांमध्ये नांदेड, बीड, पुणे , सोलापूर आणि छत्रपती संभाजी नगर येथून मोठ्या प्रमाणात सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला. ९ जुलै रोजी नांदेड येथे एफडीएने नांदेड पोलिसांसह मे. अफराह कलेक्शन या विक्रेत्यावर टाकलेल्या छाप्यामध्ये ‘गोरी ब्युटी क्रीम, फेस फ्रेश ब्युटी क्रीम, उजूबा एक्स्ट्रा व्हाईट, गोल्ड ग्लीम’ ही पाकिस्तानमध्ये उत्पादित होणारी सौंदर्य प्रसाधाने आढळून आले. ही सौंदर्य प्रसाधाने खरेदी केल्याची कोणतीही देयके मे अफराह कलेक्शनकडे आढळले नाही. त्यामुळे पाकिस्तानी सौदर्य प्रसाधनाचा ३९ लाख ७० हजार रुपयांचा साठा जप्त केला. तसेच या साठ्यातील तीन नमूने चाचणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवून नांदेड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड येथील मे. मंगलमूर्ती एजन्सीजवर टाकलेल्या छाप्यामध्ये दिल्लीतील पाओंटा साहिब येथील लँडमार्क लॅबोरेटरीजच्या ‘मेरा रूप श्रुंगार क्रीम’ या उत्पादनाच्या कार्टनवर ‘तेजस्वी आणि नैसर्गिक कांती’, ‘उजळ आणि डागमुक्त त्वचा’, ‘काळे डाग कमी करते’ यासारखे आक्षेपार्ह दावे केल्याचे आढळले. या सौंदर्य प्रसाधनांचा ३६ हजार रुपये किंमतीचा साठा जप्त केला. पुण्यातील शुक्रवार पेठेतील कल्पतरू आयुर्वेद या दुकानामध्ये विनापरवाना भस्म व रस औषधांची विक्री होत असल्याच्या माहितीवरून केलेल्या कारवाईमध्ये प्लास्टिक पिशव्या, बरण्या व बाटल्यांमध्ये साठविलेल्या भस्म साठ्यावर बॅच क्रमांक, उत्पादन किंवा मुदतबाह्य तारीख, उत्पादक नाव, पत्ता व परवाना क्रमांक यासारखी अनिवार्य माहिती नमूद नसल्याचे आढळले. या प्रकरणी दुकानाचे मालक राकेश शिर्के हे खरेदी देयके किंवा मालकी हक्काची कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. या दुकानातील ५० लाख ३६ हजारांचा साठा जप्त केला.

Tukaram mundhe : मेडिकल स्टोअरवर कारवाई

औषध खरेदीची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत केलेल्या कारवाईमध्ये रुग्णांना औषधांची चिठ्ठी न देणे, औषधांची देयके न ठेवणे, थंड तापमानातील औषधे रॅकवर ठेवणे, मुदतबाह्य झालेली औषधे स्वतंत्र न ठेवणे, खरेदी-विक्रीत तफावत आणि एच व एच१ या शेड्युल्डवरील औषधांची विना औषधचिठ्ठी विक्री करत असल्याप्रकरणी सोलापूरमधील नोबल रुग्णालयामधील रुग्णांना फातिमा मेडिकल स्टोअर आणि छत्रपती संभाजीनगरमधील कृपामाई रुग्णालयातील मेडिकल स्टोअरवरचा परवाना रद्द करण्यात आला.

हेही वाचा : Skill education : कौशल्य शिक्षण समाजातील अंतिम व्यक्तीपर्यंत न्यावे : राज्यपाल

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत