५ कोटीपेक्षा जास्त किमतीचा Gutkha, पानमसाला महिनाभरात जप्त
४५७ जणांना करण्यात आली अटक
मुंबई :
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार २५ मे ते २४ जून या कालावधीत राज्यभरात तब्बल ४४६ आस्थापनांवर धाडी टाकल्या. या कारवाईंमध्ये ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ किमतीचा माल जप्त करत ४५७ जणांना अटक करण्यात आली.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यातील एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २५ मे ते २४ जूनदरम्यान मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध कारवाई केली. त्यामध्ये कोकण विभागात १५५ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून २८ लाख ७७ हजार २०२ किमतीचा माल जप्त केला. तसेच १५६ जणांना अटक करण्यात आले. मुंबई विभागात ९० आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ३९ लाख २ हजार ५३५ किमतीचा माल जप्त करून ८९ व्यक्तींना अटक केली. नाशिक विभागात ३१ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून १ कोटी ४३ लाख २६ हजार ६०६ किमतीचा माल जप्त करत २९ व्यक्तींना अटक केली. नागपूर विभागात ३८ अस्थापनांची तपासणी करून ९६ लाख ८८ हजार ३८१ किमतीचा माल जप्त करून २९ जणांना अटक केली. पुणे विभागात ८७ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ८४ लाख ८९ हजार ८८९ किमतीचा माल जप्त करण्यात आला तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३८ आस्थापनाविरुद्ध कारवाई करून ९६ लाख ८८ हजार ३८१ किमतीचा माल व १३ वाहने जप्त केली. अमरावती विभागात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये २५ आस्थापनांवर कारवाई करून १ कोटी १४ लाख ७१ हजार ५०२ किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
या धडक मोहिमेअंतर्गत राज्यभरातून ४५७ व्यक्तींना अटक करून ५ कोटी ५५ लाख ५ हजार २९४ रुपये किंमतीचा माल जप्त केला.
Gutkha : पानमसालाबाबत तक्रार नोंदवा
तक्रार नोंदणीसाठी टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावरती संपर्क साधावा . तसेच अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत तक्रारीसाठी FoSCoS Portal, food safety connect app व टोल फ्री क्रमांक (१८००२२२३६) यावरती संपर्क साधावा.
शंका येताच तक्रार करा
नागरिकांना अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारची शंका येताच त्यांनी अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. तक्रार करतेवेळी स्वतःचे नाव व पत्ता/संपर्क क्रमांक, भेसळ केल्या जाणाऱ्या ठिकाणाचा या आस्थापनेचा अचूक पत्ता व कोणत्या अन्नपदार्थात भेसळ केली जाते याची माहिती तक्रारीत नमूद करावी असे आवाहन करण्यात येत आहे.



