Jaslok Hospital: रोबोटिक तंत्रज्ञानाने गुदाशयाचा कर्करोग बरा

पोटावर कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता 'रोबोटिक' पद्धतीने कर्करोगावर मात

मुंबई :

मुंबईतील नामांकित ‘जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’ने वैद्यकीय क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्ण जे. एम. यांच्यावर अत्यंत प्रगत अशी ‘रोबोटिक ट्रान्स-अॅनल मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरी’ (टीएएमआयएस) यशस्वीपणे पार पाडली आहे. या प्रक्रियेमुळे पोटावर कोणताही मोठा छेद न घेता, गुदाशय न काढता किंवा कायमस्वरूपी कृत्रिम विष्ठा मार्ग (स्टोमा) न बनवता सुरुवातीच्या टप्प्यातील गुदाशयाचा कर्करोग पूर्णपणे काढून टाकण्यात यश आले आहे.

जसलोक हॉस्पिटल voice of eastern
जसलोक हॉस्पिटल

रुग्णाला विष्ठेमधून रक्त येण्याचा त्रास होत होता, ज्यानंतर तपासणीत त्यांच्या गुदाशयात ४ ते ५ सेमी आकाराची मोठी गाठ आढळली. पुढील तपासणीत स्थानिक पातळीवर मर्यादित असलेल्या सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची पुष्टी झाली. पारंपरिक पद्धतीनुसार यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते, ज्यामध्ये गुदाशय काढून पोटात कृत्रिम मार्ग तयार करावा लागतो (जिथे विष्ठा पिशवीत गोळा होते). मात्र, रुग्णाचे वय ७५ वर्षे असणे आणि त्यांना मधुमेह, हृदयविकार व यकृताचा आजार असल्याने पारंपरिक शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची होती.

 Jaslok Hospital : ‘दा विंची सर्जिकल रोबोट’ वापरून शस्त्रक्रिया

यावर उपाय म्हणून जसलोक हॉस्पिटलच्या बहुविद्याशाखीय टीमने ‘दा विंची सर्जिकल रोबोट’ वापरून नैसर्गिक गुदा मार्गाद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या रोबोटिक प्लॅटफॉर्मच्या अचूकतेमुळे अवयवांचे कार्य सुरक्षित ठेवून कर्करोगाची गाठ यशस्वीपणे काढून टाकण्यात आली. यामुळे रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारली आणि त्यांना अवघ्या २ दिवसांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. अंतिम पॅथॉलॉजी रिपोर्टनुसार रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा झाला असून, शस्त्रक्रियेला ८ महिने उलटून गेल्यानंतरही रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त आहे. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व जीआय सर्जरी व रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. चिंतामणी गोडबोले यांनी केले, तर त्यांना ज्‍युनिअर कन्सल्टंट डॉ. पर्णाशा आणि भूलतज्ज्ञांच्या टीमने सहकार्य केले.

जीआय सर्जरी आणि रोबोटिक कोलोरेक्टल सर्जरीचे कन्सल्टंट डॉ. चिंतामणी गोडबोले म्हणाले, “रोबोटिक ‘टीएएमआयएस’ ही गुंतागुंतीच्या गाठींच्या उपचारांमधील एक महत्त्वपूर्ण प्रगती आहे. वृद्ध व वैद्यकीयदृष्ट्या नाजूक रुग्णांमध्ये पारंपरिक शस्त्रक्रियेमुळे मोठे धोके निर्माण होऊ शकतात. रोबोटिक प्लॅटफॉर्म उत्तम अचूकता आणि दृश्यमानता प्रदान करतो, ज्यामुळे मोठी शस्त्रक्रिया टाळून प्रभावी कर्करोग उपचार देणे शक्य होते.”

हेही वाचा :  Tukaram Mundhe : मुंबईकरांना भेसळयुक्त सॉसचा धोका; तुकाराम मुंढेची कारवाई

कृतज्ञता व्‍यक्त करत जे.एम. म्‍हणाले, “माझ्या वयात आणि आजारपणामुळे मोठ्या शस्त्रक्रियेचा विचार भीतीदायक होता. पण डॉक्टरांनी मला धीर दिला. ही शस्त्रक्रिया मी विचार केला होता त्यापेक्षा खूप सुलभ झाली आणि मी लवकरच माझ्या सामान्य दिनचर्येत परतलो.” जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सीईओ जितेंद्र हरियान म्‍हणाल, “यासारख्या केसेस आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधनाचे महत्त्व अधोरेखित करतात. एखाद्या वृद्ध रुग्णाने अत्यंत कमी त्रासाच्या उपचारांद्वारे कर्करोगावर यशस्वी मात करणे कमालीचे समाधान देणारे आहे. प्रगत तंत्रज्ञान व तज्ज्ञ वैद्यकीय काळजी एकत्र आणण्यावर जसलोकचा भर कायम आहे.”

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत