Jogeshwari Trauma: न्यूरोसर्जरीच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार

अत्याधुनिक डीएसए यंत्र पुन्हा सुरू करण्याबरोबरच तज्ज्ञ डाॅक्टरांची नियुक्ती

मुंबई :

अपघातामध्ये डोक्याला मार लागल्याने अनेक रुग्णांना मज्जासंस्थेसंदर्भातील समस्यांचा सामना करावा लागतो. या रुग्णांवर तातडीने उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेले डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (डीएसए) यंत्र जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयामध्ये पुन्हा सुरू करण्यात येत आहे. न्यूरोसर्जरीसाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याबराेबरच येत्या काही दिवसांमध्ये न्यूरो बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर शस्त्रक्रिया सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी करण्यात रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या यंत्रामुळे रुग्णालयात येणाऱ्या अपघातातील डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या तसेच पक्षाघाताच्या रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

जोगेश्वरी ट्रॉमा केअर voice of eastern
जोगेश्वरी ट्रॉमा केअर

जोगेश्वरी ट्रॉमा केअर हे अपघातग्रस्त रुग्णांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग आणि परिसरातील अपघातांमुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेले, पक्षाघात झालेले किंवा तातडीच्या न्यूरोलॉजिकल उपचारांची गरज असलेले रुग्ण येथे मोठ्या प्रमाणावर येतात. अशा रुग्णांसाठी वेळेत निदान आणि उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. रुग्णालयामध्ये अनेक वर्षांपासून डीएसए यंत्र उपलब्ध होते. मात्र, त्याचा अपेक्षित वापर होत नव्हता. रुग्णालयामध्ये दररोज साधारणपणे १५० च्या आसपास रुग्ण येत असतात. रुग्णांची ही संख्या लक्षात घेता कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. छाया शिंदे यांनी ही सुविधा पुन्हा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून देण्याच्या सूचना ट्रॉमा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निरंजन क्षीरसागर यांना दिल्या. त्यानुसार ही सुविधा पुन्हा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाने पावले उचलली. या यंत्राचा योग्य वापर करण्यासाठी आवश्यक डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळाल्याने न्यूरोसर्जरी विभागाची सेवा पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या सुविधेसाठी तीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूरो बाह्यरुग्ण विभाग सुरू झाल्यानंतर हळूहळू न्यूरोसर्जरीच्या शस्त्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहेत. न्यूरोसर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे गंभीर रुग्णांना तातडीने उपचार देणे शक्य होणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपलब्धतेमुळे सध्या सुरू असलेला विभाग अधिक क्षमतेने सुरू होण्यास मदत होणार आहे. न्यूरोसर्जरीसाठी अत्याधुनिक सुविधा मर्यादित ठिकाणी उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांना मुंबईतील मोठ्या रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागते. जोगेश्वरी ट्रॉमा केअरमध्ये अत्याधुनिक डीएसए यंत्र आणि तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध झाल्याने रुग्णांना उपचाराचा मार्ग सुकर होणार आहे.

डीएसए म्हणजे काय

डीएसए म्हणजे डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी. या अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने मेंदू आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचे अचूक निदान करण्यास मदत होते. अपघातामुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांच्या उपचारात वेळेला मोठे महत्त्व असते. अशा परिस्थितीत निदान आणि आवश्यक हस्तक्षेप उपचार लवकर झाल्यास रुग्णाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे ट्रॉमा केअर रुग्णालयात ही सुविधा कार्यान्वित होणे महत्त्वाचे मानले जात आहे.

Jogeshwari trauma care : गरीब रुग्णांना दिलासा मिळणार

मोठ्या न्यूरोसर्जरी शस्त्रक्रियांचा खर्च अनेकदा पाच ते सहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, शासकीय योजनांच्या माध्यमातून पात्र रुग्णांना या उपचारांचा मोठा भाग विनामूल्य मिळण्याची शक्यता आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तसेच रुग्णालयातील उपलब्ध निधीच्या माध्यमातून पात्र रुग्णांना उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Newborns die : राजावाडी रुग्णालयामध्ये तीन नवजात शिशूंचा मृत्यू

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत