Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी ११ ऑगस्टला संयुक्त बैठक

कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती

मुंबई :

गणपती बाप्पांचा गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री व मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गणेशोत्सव मंडळातील सदस्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ही बैठक मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, नाना चौक येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डी विभाग, दुसरा मजला, सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुंबईत सार्वजनिक गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणात विविध मंडळाचे गणपती विसर्जनासाठी येतात. त्याअनुषंगाने प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येतात. याबाबत सुसूत्रीकरण व समन्वय असणे आवश्यक आहे. गणेशोत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासन व गणेशोत्सव मंडळांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

यंदाचा गणेशोत्सव सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ ते शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध उपक्रमांचे योग्य नियोजन, समन्वय तसेच गणेशोत्सव मंडळांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळांच्या प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना व मार्गदर्शन मांडावे, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.

सर्व गणपती मंडळे व समन्वय समिती अधिकारी, दक्षिण मुंबईतील नगरसेवक, पोलीस, महानगरपालीकेच्या डी विभाग कार्यालयातील सर्व विभागातील संबंधित अधिकारी, वाहतूक पोलीस, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अग्निशमन दलाचे अधिकारी, बेस्ट, ग्राहक सेवा केंद्र इत्यादी विभाग बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Ganeshotsav 2026 : वाहतूक, स्वच्छता व सुरक्षेवर चर्चा

बेस्टच्या बसफेऱ्यांमध्ये वाढ करणे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मेट्रोच्या फेऱ्या व धावण्याच्या वेळेत वाढ करणे, तसेच शहरातील विविध ठिकाणी सार्वजनिक फिरते शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच, सार्वजनिक ठिकाणे आणि समुद्रकिनाऱ्यांवरील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविणे, महापालिकेकडून गणेश मंडपांसाठी आवश्यक परवानग्या, वीज पुरवठा, समुद्रात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अधिक संख्येने समुद्र तटरक्षकांची तैनाती करणे, यांसह मुंबईकरांच्या सुरक्षितता व सुविधांशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा : ३ महिन्यांच्या बाळाच्या हृदयावर दुर्मिळ chest wall reconstruction शस्त्रक्रिया यशस्वी

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत