Mard Strike : निवासी डॉक्टरांचे बेमुदत आंदोलन कायम
मुंबई :
सीसीएमपी प्राप्त होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी नोंदणी करण्याच्या प्रस्तावासंदर्भात बुधवारी सायंकाळी मार्डच्या प्रतिनिधींची वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या संचालक आणि एमएमसीच्या निबंधकांसोबत झालेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने मार्डने आपले बेमुदत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजीही बंद कायम असणार असल्याचे मार्डकडून जाहीर करण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशाेधन संचालनालयाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये मार्डच्या प्रतिनिधींनी त्यांच्या सर्व मागण्या संचालक व निबंधकांसमोर मांडल्या. या मागण्यांची बैठकीमध्ये गंभीर दखल घेऊन सर्व मागण्या तातडीने मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येतील तसेच येत्या काही दिवसांत सकारात्मक व ठोस निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. तसेच काही विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांचा कायदेशीर चौकटीत विचार करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. मात्र, निवासी डॉक्टरांच्या प्रमुख मागण्यांबाबत बैठकीतमध्ये कोणताही ठोस अथवा समाधानकारक निर्णय अथवा आश्वासन देण्यात आले नाही. त्यामुळे मार्डने ६ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्यव्यापी बेमुदत आंदोलन नियोजित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टरांच्या न्याय्य मागण्यांवर शासनाकडून अधिकृत व समाधानकारक निर्णय होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील. असा इशारा मार्डकडून देण्यात आला. राज्यातील आरोग्य व्यवस्था तसेच निवासी डॉक्टरांच्या हितासाठी शासनाने लवकरात लवकर सकारात्मक व निर्णायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मार्डचे अध्यक्ष डॉ. अथर्व शिंदे, मुख्य समन्वयक डॉ. विनायक शहा तसेच बीएमसी मार्डचे सरचिटणीस डॉ. शंकर जगताप यांनी व्यक्त केले.
Mard strike : रुग्णसेवेवर परिणाम नाही
मार्डने पुकारलेल्या बंद मुळे मुंबईतील केईएम, नायर, शीव, कूपर आणि जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी बुधवारी बाह्यरुग्ण विभागातील सेवा सकाळी ८ वाजल्यापासून पूर्णपणे बंद ठेवली. या बंदमध्ये राज्यातील साधारणपणे पाच हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने केलेल्या पर्यायी व्यवस्थेमुळे आरोग्यसेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. ‘मार्ड’ने बाह्यरुग्ण विभागातील आरोग्य सेवा बंद ठेवली असली तरी अतिदक्षता, अपघात विभाग, शस्त्रक्रियागृहामध्ये आरोग्यसेवा सुरळीत ठेवली होती. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागांची जबाबदारी विभाग प्रमुख, वरिष्ठ डॉक्टर, सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक यांच्यावर सोपवल्याने फारसा परिणाम जाणवला नाही. या डॉक्टरांनी बाह्यरुग्ण विभागामध्ये आरोग्यसेवा पुरविल्याने रुग्णसेवेवर फारसा परिणाम दिसून आला नाही. रुग्णालयांमध्ये सकाळी काहीवेळ रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली. मात्र अवघ्या काहीवेळातच गर्दी कमी झाली. पण डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांची तपासणी करण्यास विलंब होत होता. परिणामी साधारणपणे दररोज दुपारी १२ वाजता बाह्यरुग्ण विभागातील गर्दी ओसरते. मात्र बुधवारी दुपारी १.३० वाजेपर्यंतही रुग्णांची गर्दी पाहायला मिळत होते. यामुळे रुग्णांवर उपचार होत असले तरी बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचाराला काही प्रमाणात विलंब झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांच्या पुकारलेल्या बंदमुळे सकाळी सुरुवातील काही प्रमाणात रुग्णांची गर्दी वाढली होती. त्यामुळे काही रुग्णांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा येण्याचा निर्णय घेत माघारी फिरल्याचे दिसून आले. त्यामुळे गर्दी काही प्रमाणात कमी झाली.
Mard Strike : पुढील आठवड्यात पुन्हा येण्याचा सल्ला
मार्डने पुकारलेल्या बंदमध्ये सध्या बाह्यरुग्ण विभागातील सेवा बंद करण्यात आली असली तरी हा बंद चिघळल्यास त्याचा होणारा शस्त्रक्रियांवर होण्याची शक्यता लक्षात घेऊन बाह्यरुग्ण विभागाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वरिष्ठ डॉक्टर व प्राध्यापकांनी अनेक रुग्णांना पुढील आठवड्यात पुन्हा येण्याचा सल्ला दिला. मात्र शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांपैकी अत्यावश्यक शस्त्रक्रिया असलेल्या रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यात येत होते. मार्डच्या बंदला पहिल्या दिवशी निवासी डॉक्टरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असला तरी रुग्णसेवेवर त्याचा फारसा परिणाम झाल्याचे दिसून आले नाही.



