MSBTE : पॉलिटेक्निकचे वर्ग १५ जुलैपासून सुरू
एमएसबीटीईकडून शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

मुंबई :
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने (एमएसबीटीई) नव्या शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार राज्यातील तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांचे २०२६-२७ हे शैक्षणिक वर्ष १५ जुलैपासून सुरू होणार आहे. या वेळापत्रकामध्ये प्रवेश प्रक्रिया, वर्ग, परीक्षा, निकाल आणि परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्यात सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित मिळून सुमारे ५०० पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये १ लाखांहून अधिक जागा उपलब्ध आहेत. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका प्रवेशासाठीची ऑनलाइन प्रक्रिया २० जूनपासून सुरू होणार असून त्यानंतर जुलैमध्ये नियमित वर्गांना प्रारंभ होणार आहे. एमएसबीटीईने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाच्या सत्र आणि वार्षिक वर्ग १५ जुलैपासून सुरू होतील. तर इतर वर्षांचे शैक्षणिक सत्र १ जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रवेश, परीक्षा आणि निकालाचे नियोजन करता यावे यासाठी मंडळाने सविस्तर शैक्षणिक दिनदर्शिका संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.
हिवाळी २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार असून सैद्धांतिक परीक्षा १७ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेचा निकाल जानेवारी २०२७ च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. तर उन्हाळी २०२७ परीक्षेच्या प्रात्यक्षिक परीक्षा ८ ते १९ एप्रिलदरम्यान आणि सैद्धांतिक परीक्षा २७ एप्रिल ते १९ मेदरम्यान होणार आहेत. या परीक्षेचा निकाल जून २०२७ च्या तिसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे.
हेही वाचा : Mumbai Uiversity : बीई, बी.टेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय नॅनोसायन्स केंद्रामध्ये प्रवेश
MSBTE : शैक्षणिक दिनदर्शिकेचे वेळापत्रक
सत्र पद्धतीने अभ्यासक्रम
- प्रथम वर्षाचे सत्र : १५ जुलै ते ३० ऑक्टोबर २०२६
- इतर वर्षांचे सत्र : १ जुलै ते १७ ऑक्टोबर २०२६
- प्रथम चाचणी : १० ते ११ सप्टेंबर २०२६
- दुसरी चाचणी : १२ ते १४ ऑक्टोबर २०२६
वार्षिक पद्धतीने अभ्यासक्रम
- प्रथम वर्षाचे शैक्षणिक सत्र : १५ जुलै २०२६ ते ३ एप्रिल २०२७
- इतर वर्षांचे सत्र : १ जुलै २०२६ ते ३ एप्रिल २०२७
- पहिली चाचणी : २ ते ४ नोव्हेंबर २०२६
- दुसरी चाचणी : ३१ मार्च ते २ एप्रिल २०२७



