Mumbai Uiversity : बीई, बी.टेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय नॅनोसायन्स केंद्रामध्ये प्रवेश
मुंबई :
विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रवेश असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्रामध्ये आता बीई व बी.टेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. बीई व बी.टेकच्या विद्यार्थ्यांना या अत्याधुनिक आणि बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमात प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यानुसार राष्ट्रीय नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राकडून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना २६ मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी हे क्षेत्र इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, आरोग्य सेवा, ऊर्जा, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, एरोस्पेस, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि शाश्वत विकास यांसारख्या अनेक उद्योगांमध्ये वेगाने परिवर्तन घडवत आहे. अशा परिस्थितीत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील विशेष शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात लाभदायक ठरु शकेल. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नॅनोमटेरियल्स, स्मार्ट डिव्हाइसेस, सेन्सर्स, ऊर्जा साठवण प्रणाली, नॅनोमेडिसिन, नॅनो फॅब्रिकेशन आणि प्रगत विश्लेषण तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.
बीई, बी.टेक विद्यार्थ्यांना थेट एमएस्सी द्वितीय वर्षात प्रवेश
यावर्षी केंद्रातर्फे दोन वर्षांच्या एम.एस्सी. (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) अभ्यासक्रमासोबतच बी.एस्सी. (ऑनर्स), बी.एस्सी. (ऑनर्स विथ रिसर्च) आणि पीजी डिप्लोमा (नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तसेच संबंधित शाखांतील बीई आणि बी.टेक विद्यार्थ्यांना एम.एस्सी. अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जैवतंत्रज्ञान आणि प्रगत नॅनोटेक्नॉलॉजी संशोधन याचे संधीचे व्यापक दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उदयोन्मुख स्टार्टअप्समध्ये करिअरच्या संधी उपलब्ध
या एक वर्षीय विशेष एम.एस्सी. अभ्यासक्रमामुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपल्या करिअरला नॅनोटेक्नॉलॉजीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्राकडे वळविण्याची संधी मिळणार आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन संस्था, आरअँडडी प्रयोगशाळा, सेमीकंडक्टर उद्योग, बायोमेडिकल क्षेत्र, नॅनोमटेरियल्स उद्योग, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान तसेच उदयोन्मुख स्टार्टअप्समध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. केंद्रात अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा, प्रगत उपकरणे, उद्योगाभिमुख प्रशिक्षण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य उपलब्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. संशोधनाभिमुख शिक्षण, कौशल्य विकास आणि नवोन्मेष यावर भर देणाऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टीकोनाशी ही संकल्पना सुसंगत असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
Mumbai University : कोण करू शकतो अर्ज
बी.एस्सी., बीई आणि बी.टेक विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेनुसार अर्ज करावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अंतिम सत्राची परीक्षा अद्याप दिली नाही किंवा ज्यांचे निकाल अद्याप घोषित झालेले नाहीत, असे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात. मात्र, त्यांनी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचे निकाल प्रवेशाच्या अंतिम दिवसापूर्वी किंवा त्यादिवशी सादर करणे आवश्यक राहील असेही केंद्रामामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.



