Sejal Pawar : १५ दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठवले
केईएम रुग्णालयाची कारवाई, सविस्तर चौकशीसाठी समिती
मुंबई :
सेजल पवार हिने स्टॅन्डअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान केलेल्या काही आक्षेपार्ह वक्तव्यांची दखल घेत केईएम रुग्णालय प्रशासनाने तिच्यावर कारवाई करत तिला १५ दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणी सविस्तर चौकशी नेमण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षामध्ये सेजल पवार शिक्षण घेत आहे.

अवयवदान आणि मृतदेहासंबंधी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कार्यक्रमामध्ये सेजल पवार हिने केलेले वक्तव्य समाज माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील घटकांच्या भावना दुखावल्या गेल्या. यासंदर्भात १० जून रोजी ई-मेलद्वारे अनेक तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची दखल घेत तात्काळ वरिष्ठ प्राध्यापकांची प्राथमिक तथ्यशोधन समिती स्थापन केली. या समितीने संबंधित कार्यक्रमाचा संपूर्ण चित्रफीत आढावा घेतला तसेच विद्यार्थिनीशी प्रत्यक्ष संवाद साधला. समितीचा प्राथमिक अहवाल अधिष्ठाता कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांना शनिवारी रुग्णालयात बोलविण्यात आले. तसेच त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनीचे समुपदेशन करून सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आले आहे. यावेळी सेजल पवार हिला १५ दिवस महाविद्यालयांमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.
अहवालानुसार कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेली काही वक्तव्ये आक्षेपार्ह आणि असंवेदनशील स्वरूपाची असून ती वैद्यकीय विद्यार्थ्याकडून अपेक्षित असलेल्या प्रतिष्ठा, सहानुभूती, संयम आणि व्यावसायिक जबाबदारीशी सुसंगत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित विद्यार्थिनीनेही काही विधाने अयोग्य होती व त्यामुळे काही व्यक्तींना मानसिक त्रास झाला असण्याची शक्यता मान्य करत लेखी माफीनामा सादर केला होता.
Sejal pawar चौकशीसाठी समिती स्थापन
सेजल हिच्या चित्रफितीतील विधानांमुळे रुग्णलयाच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाली आहे. या पाच सदस्यांच्या समितीत महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापकांसह बाह्य सदस्यांचाही समावेश असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या समितीने कोणत्या बाबी तपासणे गरजेचे आहे. त्याची कार्यकक्षा काय असावी, याबाबत मंजुरी मिळाल्यानंतर चौकशीला सुरुवात होईल.
सेजल पवार हिला १५ दिवसाच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्यासाठी पाच सदस्यांची समिती नियुक्त केली जाणार आहे. याबाबत अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात येणार आहे.
– डॉ हरीश पाठक, अधिष्ठाता, केइएम रुग्णालय



