Heatstroke : राज्यात उष्माघाताचे २९७ रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

 

मुंबई :

यंदा राज्यामध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यामध्ये मागील तीन महिन्यांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. १ मार्चपासून आतापर्यंत राज्यभरात एकूण २९७ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून, १८ संशयित मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

heatstroke चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यामध्ये १ मार्चपासून २९७ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मे महिन्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मेमध्ये साधारणपणे २५८ रुग्णांची नोंद झाली आहे. मार्चमध्ये अवघ्या ७ रुग्णांची नोंद झाली होती. तर एप्रिलमध्ये ३२ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४८ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ नंदुरबारमध्ये २८, गडचिरोलीमध्ये २२, नाशिकमध्ये २१, अमरावती आणि वर्धा येथे प्रत्येकी २०, तर बुलढाणा जिल्ह्यात १९ रुग्ण, यवतमाळ आणि नांदेडमध्ये प्रत्येकी १४ रुग्णांची नोंद झाली आहे.

Heatstroke : आठ अधिकृत, तर संशयित मृत्यू

उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अकोला जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी दोन मृत्यू, तर गडचिरोली आणि लातूर येथे प्रत्येकी एक मृत्यूची नोंद आहे. तसेच संशयित मृत्यूंमध्ये जळगाव आणि नागपूर येथे प्रत्येकी तीन, अहमदनगर, अकोला, अमरावती, गोंदिया आणि लातूर येथे प्रत्येकी दोन, तर गडचिरोली आणि सोलापूरमध्ये प्रत्येकी एक संशयित मृत्यू नोंदविण्यात आला आहे.

मुंबईत एकही heatstroke चा रुग्ण नाही

मुंबईतील नागरिकांना यंदाचा उकाडा असह्य झाला असला तरी मुंबईमध्ये उष्माघाताच्या एकाही रुग्णाची किंवा मृत्यूची नोंद नाही. तसेच कोल्हापूर, धुळे, उस्मानाबाद, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही उष्माघाताची प्रकरणे आढळून आलेली नाहीत.

विदर्भ आणि मराठवाडा सर्वाधिक प्रभावित

आकडेवारीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक परिणाम दिसून आला आहे. अमरावती, अकोला, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि नागपूरसह मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये उष्माघाताची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

हेही वाचा : Bmc school : शाळांतील वर्गखोल्यांचे भाडे महागणारच

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत