St. George’s Hospital : एचबीओटीसह २४ तास रक्तशुद्धीकरण केंद्र सुरू
रुग्णांना मिळणार दिलासा
मुंबई :
अपघात, मधुमेहाने झालेल्या जखमा किंवा शस्त्रक्रियेनंतर जखम बरी करण्यासाठी सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी (एचबीओटी) केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांना आता सेंट जॉर्जेस रुग्णालयातच उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जेणेकरून रुग्णांना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहेत. तसेच रुग्णालयात १२ तास सुरू असलेले रक्तशुद्धीकरण केंद्र हे आता २४ तास रुग्णांच्या सेवेत कार्यरत राहणार आहे. त्यामुळे रुग्णांना रात्री-अपरात्रीही रक्तशुद्धीकरणाची सुविधा मिळणार आहे.

अपघात, मधुमेहाने झालेल्या जखमा किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांच्या जखमी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी रुग्णांना एचबीओ थेरपी दिली जाते. रुग्णांना ४५ ते १२० मिनिटांपर्यंत ही थेरपी दिली जाते. रुग्ण आरामात बसून किंवा झोपून हे उपचार घेऊ शकतात. त्यामुळे रुग्णांच्या जखमा लवकर भरून येऊन त्यांना दिलासा मिळतो. मात्र सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये हे केंद्र नसल्याने आठवड्याला किमान सात ते आठ रुग्णांना रुग्णांना जे.जे. रुग्णालयामध्ये पाठविण्यात येत असे. या रुग्णांना रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून ने- आण केली जात असली तरी, या प्रवासाचा रुग्णांना त्रास होत असे. त्यामुळे रुग्णांना सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्येच एचबीओ थेरपी मिळावी यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, गुरुवारपासून रुग्णालयामध्ये एचबीओटी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सेंट जॉर्जेस रुग्णालयातील रुग्णाला आता रुग्णालयातच एचबीओ थेरपी मिळणार आहे.
St. George’s Hospital : दोन वर्षांत रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये ७०० रुग्णांची नोंदणी
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये ७०० रुग्णांची नोंदणी झाली आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत चालणाऱ्या या रक्तशुद्धीकरण केंद्रामध्ये आतापर्यंत १० हजार रक्तशुद्धीकरणाचे सत्र झाले आहेत. आपत्कालीन स्थितीमध्ये येणाऱ्या रुग्णाला या केंद्रामध्ये रात्री – अपरात्रीही रक्तशुद्धीकरण सुविधा उपलब्ध केली जात असे. मात्र नियमित रुग्णांनाही सुविधा मिळावी अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत होती. त्यामुळे आता सेंट जॉर्जेस रुग्णालयातील रक्तशुद्धीकरण केंद्र हे २४ तास सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.
एचबीओटी आणि २४ तास रक्तशुद्धीकरण केंद्रांचे गुरुवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच यावेळी सेंट जॉर्ज रुग्णालयातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात आलेल्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्ड क्रमांक १० आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिकदायित्व निधीतून उपलब्ध केलेल्या अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले.



